‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्चला होणारा मोर्चा पूर्णशक्तीनिशी यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन !

मिरज (जिल्हा सांगली), ४ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापिठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे करण्यात यावे, या मागणीसाठी १७ मार्च या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी ३ वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. नामविस्ताराचा हा मोर्चा पूर्णशक्तीनिशी यशस्वी करण्यासाठी आणि या मोर्च्यात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. याच अनुषंगाने १ मार्च या दिवशी मिरज येथील एका कार्यक्रमानिमित्त आलेले विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी श्री. राहुल नार्वेकर निवेदन स्वीकारून म्हणाले की, मुंबई येथील ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’चे नाव पालटले, त्याप्रमाणे ‘शिवाजी विद्यापिठा’चे नाव पालटणे आवश्यक आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई यांनी श्री. नार्वेकर यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ नावाचा ग्रंथ भेट दिला.

याच वेळी समितीच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे जत (जिल्हा सांगली) येथील आमदार श्री. गोपीचंद पडळकर, सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजपचे आमदार श्री. सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार श्री. जयंत पाटील यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी जयंत पाटील म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीने केलेली ही मागणी योग्य आहे.
विधान परिषदेत नामकरणाचा विषय मांडतो ! – गोपीचंद पडळकर, आमदार
भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर म्हणाले की, शिवाजी विद्यापिठाच्या नामकरणाचा विषय महत्त्वाचा असल्याने मी विधान परिषदेच्या सभागृहात हा विषय मांडतो. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले की, हा विषय मला जाणून घ्यायचा होता. तोच ग्रंथ तुम्ही मला दिला आहे. समितीसह सर्व हिंदुत्वाच्या कार्याविषयी मला माहिती जाणून घ्यायची आहे. |
शिवाजी विद्यापिठाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करा ! – बस्तीस शिराळा येथे निवेदन

बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार हसन मुल्लाणी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ‘विश्वासराव नाईक साखर कारखान्या’चे माजी संचालक श्री. रणजितसिंह नाईक, बजरंग दलाचे श्री. ऋषिकेश भोसले, अधिवक्ता शुभम् देशमुख, सर्वश्री राजवर्धन देशमुख, गजानन कुंभार, शरद नायकवडी यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.