‘शिवराज्याभिषेक आणि हिंदुसाम्राज्य विस्तार’ यांविषयी प्रसिद्ध होणारी लेखमाला !

१. हिंदवी स्वराज्यासाठी मराठ्यांनी दिलेल्या लढ्यामागचे श्रेय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला !
मराठ्यांनी दीर्घ युद्ध गनिमी कावा हे युद्धतंत्र अवलंबून शत्रूला जेरीस आणले. शेवटी विजय संपादन केला. मराठ्यांचे धैर्य एवढे की, ते बादशाहच्या शिबिरावरही चालून गेले. बादशाहच जिवंत हातात सापडला असता; पण त्याचे दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. खंडोबल्लाळाने शिर्के यांना आपापसांतील भांडणे विसरून राष्ट्रासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या त्या आवाहनाला शिर्के यांनी प्रतिसाद दिला. अशा प्रकारे आपापसांतील वैर विसरून सर्व हिंदू एका झेंड्याखाली एकवटले.

मराठ्यांनी स्वतःचे स्वातंत्र्य युद्ध खानदेश, गोंडवन, वराड, गुजरात अशा मोगलांच्या सत्तेखालील प्रदेशात दूरपर्यंत नेऊन पोचले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिणेकडील मोगलांच्या ६ सुभ्यांवर मैसुरू आणि त्रावणकोर या मांडलिक संस्थानावरील चौथाई (हिस्सा) अन् सरदेशमुखीच्या अधिकार्याला मोगल वारसाने दिलेली मान्यता या दोन गोष्टींमुळे मराठ्यांच्या बलवर्धनाला साहाय्य मिळाले. ज्या राष्ट्रीय आणि नैतिक श्रेष्ठ तत्त्वांनी मराठ्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली अन् हिंदु स्वातंत्र्याचे युद्ध यशस्वी करण्याच्या त्यांच्या भगीरथ प्रयत्नात त्यांना धैर्य दिले, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे श्रेय आहे.
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाने मुसलमानी सत्तेची कंबर पार मोडून टाकली. सय्यद बंधूंनी दक्षिणेच्या सुभ्यातून चौथाई आणि सरदेशमुखी (कर) वसूल करण्याचा मराठ्यांना अधिकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देहत्यागानंतर मराठ्यांच्या इतिहासातील पुढचा पल्ला गाठणारी घटना, म्हणजे पहिला बाजीराव याचा राजकीय मंचावर झालेला प्रवेश होय !
२. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यामागील उद्देश
महाराष्ट्राचे राजकीय स्वातंत्र्य जिंकून परत मराठ्यांनी स्वतःची सत्ता बळकट केली, संघटित केली. त्यामुळे ते त्यांच्या पायावर उभे राहून हिंदु धर्माचे आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी कुणाशीही दोन हात करायला समर्थ झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या सवंगड्यांचा हेतू ‘मराठी राज्य स्थापन’ करण्याचा नव्हता, तर ‘हिंदवी स्वराज्य स्थापन’ करण्याचा होता. परकीय सत्तेच्या जोखडातून हिंदूंची मान मोकळी करणे, म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे. थोडक्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हाच महाराष्ट्र धर्म होय !
३. छत्रपती शिवरायांनी घेतलेली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ अपूर्ण रहाणे
समर्थ रामदासस्वामींना तीर्थक्षेत्रे भ्रष्ट झाली, याचा खेद वाटत होता. ती तीर्थक्षेत्रे केवळ महाराष्ट्रातील नव्हती, तर अखिल हिंदुस्थानातील होती. देहलीचे राजसिंहासन हे युधिष्ठिराचे सिंहासन आहे. त्या सिंहासनावर परका विराजमान झालेला असतांना छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्य प्रतिज्ञा सिद्धीस गेली, असे म्हणता येत नाही. मराठ्यांनी पंढरीच्या पुण्यभूमीत मुसलमानी चंद्रकोरीला अर्धचंद्र दिला. मुसलमानी धर्मवेड्यांच्या छळापासून नाशिक क्षेत्र मुक्त केले. तेवढ्याने छत्रपती शिवरायांनी घेतलेली शपथ पूर्णत्वाला गेली, असे म्हणता येत नाही. काशीची अवस्था काय होती ? कुरुक्षेत्र आणि हरिद्वार कुणाच्या सत्तेखाली होते ? रामेश्वरावर कोण अधिकार चालवत होता ? तेथील पूर्वजांच्या अस्थी गोदावरीत जरी विसर्जित झाल्या नसल्या, तरी भागीरथीमध्ये त्या विसर्जित झाल्या होत्या. आपल्या देवीदेवतांची मंदिरे हिमगिरीपासून रामेश्वरपर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथ पुरीपर्यंत पसरली होती. समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे अद्याप गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यात मुसलमानी विजेत्यांच्या विजयाच्या अर्धचंद्राचे प्रतिबिंब पडले होते. त्यामुळे या नद्यांचे पाणी धर्मनिष्ठांच्या स्नानसंध्येला अयोग्य अन् कलंकित करणारे होते. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षातील मुसलमानी सत्ता आणि सामर्थ्य यांचे निर्मूलन झाले नाही, तोपर्यंत धर्म विजयाने नांदणे शक्य नव्हते, तसेच हिंदु धर्म वृद्धींगत होऊन उर्जितावस्थेला येणे शक्य नव्हते. जोपर्यंत मुसलमानी स्वामित्वाखाली हिंदुस्थानची तसूभर भूमी होती, तोपर्यंत छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासस्वामी यांनी संपादित केलेले कार्य पूर्णत्वाला गेले, असे म्हणता येत नाही.
अखिल हिंदुस्थानची भूमी जोपर्यंत इस्लामी राजवटीच्या सावटातून मुक्त होत नाही, तोपर्यंत ‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवावा वा बुडवावा । धर्म संस्थापनेसाठी ॥’, अशी शिकवण समर्थ रामदासस्वामी यांनी दिली होती, ती मराठ्यांच्या विस्मृतीत गेलेली नव्हती.
(क्रमश: पुढच्या बुधवारी)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.