Fake HSRP Number Plates : वाहनांच्या ‘उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स’च्या अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुराज्य अभियानची सरकारकडे मागणी!

ठाणे (महाराष्ट्र) : महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आर्.टी.ओ.) अलीकडेच बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ची (एच्.एस्.आर्.पी.) विक्री करून या प्रणालीचा अपलाभ उठवणार्‍या अनधिकृत विक्रेत्यांना चेतावणी दिली. हे अनधिकृत विक्रेते अल्प किमतीत बनावट प्लेट्स विकत असल्याचे उघड झाल्यानंतर ही चेतवाणी देण्यात आली.

पुणे परिवहन विभागाने दिलेली चेतावणी –

बनावट प्लेट्सच्या वापरामुळे कायदेशीर समस्या आणि सुरक्षिततेची चिंता यांना तोंड द्यावे लागू शकते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार जुन्या वाहनांवर एच्.एस्.आर्.पी. बसवण्याची कार्यवाही (अंमलबजावणी) सुनिश्चित करण्यात यावी, राज्याबाहेरील वाहनमालकांना वाजवी किंमतीत ‘एच्.एस्.आर्.पी.’ बसवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच ‘एच्.एस्.आर्.पी.’च्या अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या ‘सुराज्य अभियान’ या संघटनेने सुराज्य अभियानने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लिहिलेल्या पत्रात केल्या होत्या.

‘सुराज्य अभियान’ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लिहिलेले पत्र –

‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र समन्वयक अभिषेक मुरकुटे यांनी केंद्रीय प्राधिकरणाला या प्रणालीची सुरळीत कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी पुढील उपायांचा विचार करण्याची विनंती केली आहे.

श्री. अभिषेक मुरुकुटे

१. राज्याबाहेरील वाहन मालकांचे सध्याचे निवासाचे ठिकाण कुठलेही असले तरी, अधिकृत नोंदणी केंद्रांवर त्यांना ‘एच्.एस्.आर्.पी.’ बसवण्याची अनुमती द्यावी. यामुळे मालकांना लांब अंतराचा प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि ते समयमर्यादेच्या आत ‘एच्.एस्.आर्.पी.’ बदवू शकतील.

२. नोंदणीसाठी ऑनलाइन आणि ‘मोबाइल युनिट’ यांचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून वाहनमालक त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या प्लेट्स बसवू शकतील.

‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’साठीचे विविध राज्यातील दर –

३. अनधिकृत विक्रेत्यांना या प्रणालीचा अपलाभ घेण्यापासून आणि बनावट प्लेट्सची विक्री करण्यापासून रोखण्यासाठी कठोर उपाययोजना काढावी. बनावट प्लेट्सच्या जोखमींविषयी नागरिकांना शिक्षित करण्यासाठी आणि प्लेट्स बसवण्यासाठी सरकारच्या मान्यताप्राप्त केंद्रांवर जाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जनजागृती मोहिमा चालू करावी.

४. प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुलभता सुनिश्चित करण्यासाठी ‘ऑनलाइन बुकिंग सिस्टम’चा विस्तार करावा. यामुळे वाहनमालकांना प्लेट्स बसवण्यासाठी सोयीस्कर केंद्रे निवडणे सोपे होईल.

५. ग्राहकांकडून अनावश्यक शुल्क आकारले जाऊ नये, यासाठी संपूर्ण भारतात उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्सचे दर प्रमाणित केले जावेत. ‘एच्.एस्.आर्.पी.’ची किंमत नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने एक राष्ट्रीय धोरण लागू करावे.