मे २०१३ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आलेला एस्. दुलगज दिग्दर्शित ‘संभाजी १६८९’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होता; मात्र परिनिरीक्षण मंडळाने काही दृश्ये आणि भित्तीपत्रकांवर आक्षेप घेतला. परिनिरीक्षण मंडळाने चक्क औरंगजेबाच्या अत्याचारांचे पुरावे मागितले आणि चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला ! दुलगज यांनी या अडचणीवर मात करण्यासाठी काही दृश्यांमध्ये पालट केले, राजकीय नेत्यांचे साहाय्य मागितले; मात्र या प्रयत्नांनंतरही चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. अंतिमतः डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी चित्रपटाचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजी’ ठेवले. पुन्हा परिनिरीक्षण मंडळाने औरंगजेबाच्या अत्याचारांचे पुरावे मागितले ! अनेक संघर्षांनंतर २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
हिंदु धर्मरक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाला जनतेपर्यंत पोचण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल, तर हिंदूंचे दुर्दैव यापेक्षा वेगळे ते काय ? हिंदुद्वेषी ‘बॉलीवूड’ आणि काँग्रेसी मानसिकतेच्या व्यवस्थेने हा चित्रपट ९ वर्षे रोखला. जोधा-अकबर, पद्मावत् यांसारख्या विकृत चित्रपटांना मात्र सहज अनुमती दिली ! बॉलीवूड आणि परिनिरीक्षण मंडळ यांची भूमिका नेहमीच हिंदु इतिहासाविषयी दुटप्पी राहिली. मोगल, तुर्क, आणि अरबी आक्रमकांचे उदात्तीकरण करणार्या चित्रपटांना सहज अनुमती मिळते; पण हिंदु राजे, स्वराज्यासाठी बलीदान दिलेले योद्धे यांवरील चित्रपटांना मात्र परिनिरीक्षण मंडळ कात्री फिरवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांमध्ये मुसलमानांचे अतिशय सभ्य आणि उच्च आदर्श असलेले वर्णन करण्यात आले. काल्पनिक कथांची रचना कित्येक चित्रपटांत करण्यात आली. या चित्रपटांना कोणतीही आडकाठी आली नाही. ‘बाजीराव-मस्तानी’मध्ये बाजीरावांची केवळ ‘मस्तानीवर प्रेम करणारा’ हीच प्रतिमा ठळकपणे दाखवण्यात आली. तेव्हा कोणते पुरावे मागितले गेले ? ‘पद्मावत’मध्ये खिलजीचे उदात्तीकरण होत असतांना कोणती चौकशी झाली ? ही लढाई केवळ एका चित्रपटाची नाही, तर संपूर्ण हिंदूंच्या इतिहासाच्या अस्तित्वाची आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मासाठी बलीदान आणि औरंगजेबाचा खरा चेहरा समोर येऊ द्यायचा नव्हता; म्हणून वरील चित्रपटाला अनुमती दिली गेली नव्हती. हिंदु शौर्याची गाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोचू न देण्यासाठी इतिहासाचा विपर्यास करण्याचा डाव अजूनही चालूच आहे. हिंदूंनी या विरोधात संघटितपणे आवाज उठवला पाहिजे. पराक्रमी राजांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. – सौ. अपर्णा जगताप, पुणे