Born A Hindu, Die A Hindu : हिंदु म्हणून जन्माला आलो आणि हिंदु म्हणूनच मरीन ! – डी.के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे महाकुंभमेळा आणि महाशिवरात्री उत्सव यांत सहभागी झाल्यावरून विधान

बेंगळुरू (कर्नाटक) – मी दुसरा धर्म का स्वीकारावा ? मला सर्व धर्मांविषयी  प्रेम आहे. आम्ही या धर्मात जन्म घेण्यासाठी अर्ज केला नव्हता. मी हिंदु म्हणून जन्माला आलो आणि हिंदु म्हणूनच मरीन, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे डी.के. शिवकुमार यांनी केली. त्यांनी यंदाचा महाशिवरात्र उत्सव सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’ने आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन साजरा केला. ते काँग्रेसी असूनही ते अशा कार्यक्रमाला गेले, यावरून स्वपक्षात चर्चा चालू असतांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी वरील उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार पुढे म्हणाले की,

१. काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मांचा संगम आहे. जेव्हा आपण सत्ता आणि अधिकार देतो, तेव्हा तो सर्वांना विचारपूर्वक देतो. (जर असे असेल, तर स्वपक्षातीलच लोक यावर का टीका करत आहेत ? याचा अर्थ हिंदूंच्या कार्यक्रमात जाणे, हे काँग्रेसच्या विचारसरणीत बसत नाही, असेच दिसून येत आहे ! – संपादक)

२. राज्यात आमचे सरकार सत्तेत आहे. आम्ही हिंदु धर्मदाय खाते बंद केले आहे का ? भाजपने सत्तेत असतांना वक्फ बोर्ड बंद केले नाही. ख्रिस्ती डेव्हलपमेंट बोर्ड बंद झाले आहे का ? नाही. याचे कारण आपली राज्यघटना आहे. आपल्या देशात सर्व धर्मांना समान संधी दिल्या जातात.

३. माजी मुख्यमंत्री एस्.एम्. कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्वी निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा आम्ही निवडणूक मोहिमेला ‘पांचजन्य’ असे नाव दिले होते. मग काही लोक सोनिया गांधी यांच्याकडे गेले आणि तक्रार केली; पण सोनिया गांधी यांनी ते थांबवले नाही. (यातून काँग्रेसमधील बहुतेक लोकांना हिंदूंच्या श्रद्धेशी संबंधित नावावर आक्षेप आहे. यातून काँग्रेसमध्ये हिंदुद्वेष ठासून भरला आहे, हेच लक्षात येते. – संपादक)

४. आपण हिंदूंना भाजप आणि रा.स्व. संघ यांवर सोडले आहे का ? मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माझे नाव देवाचे नाव आहे म्हणून पालटणे शक्य आहे का ? आमचे नेते राहुल गांधी हे खूप मोठे शिवभक्त आहेत. (असे आहे, तर ते महाकुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नानासाठी का गेले नाहीत ? – संपादक)

५. या प्रकरणाचा  कुंभमेळ्याशी काय संबंध आहे ? पाण्याला जात किंवा धर्म असतो का ? ही एक परंपरा आहे जी प्राचीन काळापासून चालत आली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. धर्म आणि श्रद्धा यांच्यात राजकारण मिसळू नये. (स्वपक्षातील नेते तरी याचे अनुसरण करतील का ? स्वतः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी कुंभमेळ्यावर टीका केली आहे. – संपादक) आमचे विधानसभा अध्यक्ष यु.टी. खादर हेही कुंभमेळ्याला गेले होते.

६. प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यात आणि ईशा योग केंद्रात झालेल्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो, ही माझी श्रद्धा आहे. माझा विश्‍वास माझा स्वतःचा आहे, कुणीही त्याविषयी बोलू नये. माझ्या कृतीचे कुणी (भाजपनेे) शब्दिक स्वागत करावे, अशीही आवश्यकता नाही.