Sambhal Jama Masjid : संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीला रंगकाम करण्याची आवश्यकता नाही !

  • अलाहाबाद उच्च न्यायालयात पुरातत्व विभागाने सादर केला अहवाल

  • रमझाननिमित्त मशीद समितीने रंगकाम करण्याची केली होती मागणी

संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यातील श्री हरिहर मंदिराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या तपासणीनंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर करण्यात आला आहे. मशिदीच्या आतील रचनेत केलेल्या पालटांची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तसेच ‘मशिदीला सध्या कोणत्याही रंगाची किंवा दुरुस्तीची आवश्यकता नाही’, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मशिदीच्या डिजिटल सर्वेक्षणासाठी कृती आराखडा सिद्ध केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. मशीद समितीने रमझाननिमित्त मशिदीचे रंगकाम करण्याची अनुमती मागितली होती. त्यावर न्यायालयाने पुरातत्व विभागाला याविषयी पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

१. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाचे सहसंचालक मदन सिंह चौहान, स्मारक संचालक झुल्फिगर अली आणि पुरातत्वशास्त्रज्ञ विनोद सिंह रावत यांचा समावेश असलेल्या पुरातत्व विभागाच्या पथकाने २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी उशिरा मशिदीला भेट देऊन पहाणी केली. या पहाणीचा अहवाल २८ फेब्रुवारीला न्यायालयात सादर करण्यात आला.

२. २२ डिसेंबर १९२० या दिवशी ‘अधिसूचना क्रमांक १६४५/११३३-एम्’नुसार ‘प्राचीन स्मारके जतन कायदा, १९०४’अंतर्गत संभल जामा मशिदीला ‘संरक्षित’ घोषित करण्यात आले होते.

३. न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभाग मशिदीची नियमित स्वच्छता, धूळ काढणे आणि आजूबाजूची वनस्पती काढून टाकण्याचे काम करेल. यासाठी मशीद समितीला कोणताही अडथळा निर्माण करू नये आणि पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना मशिदीत करण्यात आले अनेक पालट !

पुरातत्व विभागाच्या तपासणीत असे दिसून आले की, मशीद समितीने यापूर्वीही दुरुस्ती आणि जीर्णोद्धार यांचे काम केले होते, ज्यामुळे ऐतिहासिक रचनेत अनेक पालट झाले आहेत. मशिदीची फरशी पूर्णपणे टाइल्स आणि दगड यांद्वारे पालटण्यात आली आहे. मशिदीच्या आतील भागात सोनेरी, लाल, हिरवा आणि पिवळा रंगाचा जाड रंग लावण्यात आला आहे, ज्यामुळे मूळ पृष्ठभाग झाकला गेला आहे. मशिदीच्या आतील रंग चांगल्या स्थितीत आहे आणि त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. तथापि, बाहेरील काही ठिकाणी रंग निघाला आहे; परंतु परिस्थिती इतकी गंभीर नाही की, त्वरित काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. मशिदीच्या उत्तर आणि पश्‍चिमेकडील लहान खोल्या, ज्या ‘स्टोअर’ म्हणून वापरल्या जात आहेत, त्या जीर्ण अवस्थेत आहेत. विशेषतः या खोल्यांचे लाकडी छत कमकुवत झाले आहेत आणि त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना पालट करणार्‍या मशीद समितीला विसर्जित करून संबंधितांना कारागृहात डांबण्याचा आदेश न्यायालयाने दिला पाहिजे, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !