‘शिवराज्याभिषेक आणि हिंदुसाम्राज्य विस्तार’, यांविषयीची प्रसिद्ध होणारी लेखमाला !
‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते; म्हणूनच त्यांच्या सैन्यात आपल्याला मुसलमान दिसतात’, असे अलीकडे सांगितले जाते; पण त्यात तथ्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्युलर’ (निधर्मी) ठरवण्यासाठी करण्यात आलेला हा अपप्रचार आहे. वास्तविक पहाता छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता. वर्ष १६५८ पर्यंत छत्रपती शिवरायांच्या नोकरीत जे मुसलमान होते, त्यांची नेमणूक शहाजीराजांनी केली होती. त्या वेळी छत्रपती शिवरायांच्या पायदळात सरनोबत नूरबेग नावाचा एक मुसलमान होता.
१. छत्रपती शिवरायांच्या सेवेत काही तांत्रिक कारणासाठी मुसलमान असणे
छत्रपती शिवराय शहाजीराजांपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झाले, ते वर्ष होते १६५८. शहाजीराजे आदिलशहाच्या नोकरीत होते आणि छत्रपती शिवरायांनी स्वतंत्रपणे कारभार करण्यास आरंभ केला. शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहाय्यासाठी दिलेल्या मुसलमानांपैकी एकही मुसलमान अधिकारी वर्ष १६५७ नंतर महाराजांच्या सेवेत आढळत नाही. छत्रपती शिवरायांच्या सेवेत काही तांत्रिक कारणासाठी मुसलमान होते, हे मान्य करण्यास हरकत नाही; कारण ते सत्य आहे. त्यांच्या आरमारात सरदार दौलत खान नावाचा मुसलमान होता. त्यालासुद्धा छत्रपती शिवरायांनी ठेवून घेतले; कारण त्या वेळी मराठ्यांना नाविक युद्धाचा अनुभव नव्हता.
आजच्या आधुनिक काळातही आपल्याला तांत्रिक गोष्टी करण्यासाठी देशाबाहेरच्या व्यक्तीचे साहाय्य घ्यावे लागते. तसे साहाय्य घेण्यात काही दोष नाही, हेही इथे सांगणे नितांत आवश्यक आहे; कारण आपण स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर साधारणपणे आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानात आरमाराचे प्रमुख पद ब्रिटीश नागरिकांपैकी एखादा नागरिक भूषवत होता. आपण ज्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या चाकरीत २-४ मुसलमान होते; म्हणून शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे ध्येय पालटले नाही.

२. छत्रपती शिवरायांनी मावळे आणि जनता यांच्यात रुजवलेली राष्ट्रीयत्वाची भावना
छत्रपती शिवरायांमुळे हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंत हिंदु-मुसलमान यांच्यात कुठेही लढाई झाली, तरी त्यात हिंदूंचा विजय होत होता. मुसलमानांना धूळ खावी लागत होती. हिंदूंच्या राजकीय भाग्याला महत्त्वाची विजय प्रवर्तक कलाटणी मिळाली, ती छत्रपती शिवराय आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु रामदासस्वामी यांच्यामुळे ! छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु समाजासमोर राष्ट्रीय, तर समर्थ रामदासस्वामींनी आध्यात्मिक ध्येय ठेवले. छत्रपती शिवरायांनी रणक्षेत्रात उपयोगी पडेल, असे नवे तंत्र आणि शास्त्र वापरले. युद्ध शास्त्रात अशी क्रांती घडवून आणण्यासाठी छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा आणि डावपेच यांचा पुरेपूर उपयोग केला. ‘आपण हाती घेतलेले कार्य हे आपल्या धर्माचे आणि राष्ट्राचे कार्य आहे’, अशी भावना त्यांनी आपल्या मावळ्यांमध्ये अन् जनतेत निर्माण केली. राष्ट्रीय कर्तव्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम महत्त्वाचे नाही, हा संस्कार सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवला होता; म्हणून सरदार तानाजी यांना स्वतःच्या मुलाच्या लग्नापेक्षा कोंढाणा जिंकणे महत्त्वाचे वाटले. छत्रपती शिवरायांनी जनतेच्या मनातील दास्यवृत्ती काढली आणि स्वत्व, स्वाभिमान यांची भावना निर्माण केली म्हणूनच तानाजीने कौटुंबिक सोहळ्यापेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले.
३. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राबाहेर हिंदूंसाठी दिलेला लढा आणि समर्थ रामदासस्वामी यांनी त्यांच्या राज्याचे केलेले वर्णन
छत्रपती शिवरायांच्या सैन्याने मुसलमानांचा हिरवा झेंडा फेकून दिला आणि त्या जागी भगवा ध्वज फडकवला. हे पाहून सांगनूर प्रांतातील हिंदूंना मुसलमानी राज्याखाली रहाणे असह्य झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले, ‘हा युसूफ दुष्ट आहे. बायका-पोरांना उपद्रव देतो. सर्वांवर अन्याय करतो. गायींची हत्या करतो. आम्ही त्याच्या हाताखाली रहाण्यास कंटाळलो आहोत. तुम्ही हिंदु धर्माचे संस्थापक आणि म्लेंच्छांचे नाशक म्हणून तुमच्याकडे आलो. आम्ही तुमच्याकडे आलो; म्हणून आमच्यावर पहारा ठेवला आहे. अन्न-पाण्यावाचून आमचा जीव घेण्यास म्लेंच्छ उद्युक्त् झाले आहेत. रात्रीचा दिवस करून तुम्ही येण्याची कृपा करावी.’
महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या धर्मबांधवांनी केलेल्या हृदयद्रावक विनंतीचा अपमान छत्रपती शिवरायांनी केला नाही. हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विजापूरच्या सैन्याशी मराठ्यांचे सैन्य लढले आणि त्यांचा पराभव केला. मुसलमानांच्या तावडीतून हिंदु समाजाची मुक्तता केली. त्या प्रांतातून विजापूरची सत्ता समूळ नष्ट झाली; म्हणूनच रामदासस्वामी शिवरायांच्या राज्याचे वर्णन करतांना म्हणाले, ‘हे छत्रपती शिवाजीचे राज्य नाही, तर हे धर्माचे राज्य आहे.’ अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जनतेत शत्रूविरुद्ध निकराने लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण केली. लोकांच्या मनातील दास्यवृत्ती नष्ट केली. शत्रूला त्रस्त करून ‘आपण हिंदु धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांचे संरक्षण करू शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी या दोघांनी समाजजागृती करून जी चळवळ उभी केली, ती त्यांच्यानंतरही दीर्घकाळ टिकली, यातच त्यांचे खरे मोठेपण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; पण त्याचे हिंदु राष्ट्रात परिवर्तन करण्याचे काम त्यांच्यानंतर हिंदु समाजाने केले.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी काढलेले गौरवोद्गार
‘शिवरायांचे पुत्र संभाजीराजे यांनी अनंत यातना भोगल्या; पण धर्मपरिवर्तन केले नाही. आत्मयज्ञाच्या कृत्याने संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माचे आणि हिंदूंच्या पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे नेतृत्व करून हौतात्म्य पत्करले. म्हणूनच आज शिवरायांचा पुत्र धर्मवीर आणि हुतात्मा छत्रपती संभाजी म्हणून गौरवला जातो. ‘हिंदु धर्मासाठी आत्मबलीदान करणार्या शंभूराजांमुळेच हिंदूंच्या स्वातंत्र्यसमराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ते यथार्थ आहे.
५. छत्रपती राजाराम महाराज यांनी हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी दिलेला लढा
छत्रपती शिवरायांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन हिंदु राज्याच्या आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करून प्राणार्पणाची पवित्र शपथ घेण्यात आली. ही शपथ जेव्हा घेण्यात आली, त्या वेळी राजकोषामध्ये एक पैसासुद्धा शेष नव्हता. धनाचा पूर्णपणे अभाव असतांना आपले राष्ट्रीय स्वातंत्र्य परत मिळवण्याचा निश्चय करण्यात आला. याचा अर्थ
‘धर्मासाठी मरावे । मरूनी अवघ्यांशी मारावे ।।
मारिता मारिता घ्यावे । राज्य आपले ॥’
आणि
‘मराठा तितका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
याविषयी न करिता तकवा । पूर्वज हासती ॥’
ही समर्थ रामदासस्वामींची शिकवण त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विसरला नव्हता. उलट सर्व जनतेचा जागता धर्म होऊन बसला होता. छत्रपती राजाराम, निळू मोरेश्वर, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, सक्राजी मल्हार, परशुराम त्रिंबक, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, निंबाळकर, नेमाजी, परसोजी, ब्राह्मण, मराठे, प्रभु, राजे, शेतकरी सगळाच महाराष्ट्र मुसलमानी शत्रूच्या विरुद्ध युद्धासाठी उभा ठाकला. त्या काळात दख्खनचा भाग पुन्हा औरंगजेबाच्या हाती गेला होता. महाराजांच्या राजधानीसहित संपूर्ण महाराष्ट्र मुसलमान सेनापतींच्या सैनिकी नियंत्रणाखाली आला होता.
आपले स्वातंत्र्य परत जिंकायला बद्ध झालेल्या राष्ट्रात सर्वांत बळकट कोट म्हणजे त्याच्या छातीचा कोट ! ज्याचे ध्येय हीच त्याची राष्ट्रीय ध्वजा ! ती जिथे फडफडत राहील, तिथेच त्याची राजधानी ! सर्व महाराष्ट्र हातचा गेलो, तरी मद्रासमध्ये हे युद्ध आपण लढू. रायगड पडला, तर हिंदु पदपादशाहीचा ध्वज जिंजीवर रोवू; पण हा संघर्ष थांबणे शक्य नाही. असा अटीतटीचा विरोध करून मराठ्यांनी २० वर्षांपर्यंत औरंगजेबाच्या बलिष्ठ सैन्याला तोंड दिले आणि शेवटी त्याला पराभूत करून मरण यातना बघण्यासाठी नगरला पाठवले.
(क्रमश: पुढच्या बुधवारी)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.