PM Modi In Bageshwar Dham : देशात धर्माची थट्टा करणार्‍या नेत्यांचा एक गट कार्यरत ! – पंतप्रधान मोदी

छतरपूर (मध्यप्रदेश) येथील बागेश्‍वर धाममध्ये कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी

छतरपूर (मध्यप्रदेश) – आजकाल धर्माची थट्टा करणार्‍या नेत्यांचा एक गट आहे. ते असे लोक आहेत, जे हिंदूंच्या श्रद्धेचा द्वेष करतात. ते आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करतात, आपल्या सणांचा अन् परंपरांचा गैरवापर करतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. ते बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडून येथे बांधण्यात येणार्‍या कर्करोगावर उपचार करणार्‍या रुग्णालयाच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की,

आपली मंदिरे, पूजा केंद्रे असण्यासमवेतच सामाजिक जाणिवेची केंद्रेही आहेत. आपल्या ऋषीमुनींनी आयुर्वेद आणि योग यांचे विज्ञान दिले. जर आपण महाकुंभाकडे पाहिले, तर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी तिथे पोचून श्रद्धेचा अनुभव घेतला आहे. इतरांची सेवा करणे आणि त्यांचे दुःख दूर करणे, हाच धर्म आहे. माझा धाकटा भाऊ धीरेंद्रकृष्ण शास्त्री लोकांना जागरूक करत रहातो. तसेच एकतेचा मंत्र देतो. आता त्याने आणखी एक संकल्प केला आहे – तो म्हणजे कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीचा ! म्हणजे आता बागेश्‍वर धाममध्ये भजन, भोजन आणि निरोगी जीवनाचे आशीर्वाद मिळतील. या कामाबद्दल मी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे अभिनंदन करतो. येथे श्री हनुमानजींच्या आशीर्वादाने हे श्रद्धेचे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार आहे.

बागेश्‍वर धामचे हे नवीन रुग्णालय २५२ कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे. २ लाख ३७ सहस्र चौरस फूट जागेत बांधण्यात येणार्‍या या रुग्णालयाचा लाभ जवळच्या ७ जिल्ह्यांतील कर्करोग रुग्णांना आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना होईल.