|
मुंबई – धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त करावा, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. या विषयीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशीष शेलार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि प्रखर राष्ट्र-धर्म निष्ठेची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो.
समितीने पत्रात म्हटले आहे की,…
१. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या अतुलनीय बलीदानामुळे स्वराज्य अधिक सक्षम झाले. त्यांच्या शौर्याने प्रखर स्वदेशप्रेम आणि धर्मनिष्ठा यांचा मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
२. ‘छावा’ चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रमाच्या कथेला जिवंत करतो. महाराष्ट्र सरकारने पूर्वी ऐतिहासिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणार्या महाराष्ट्रातील महायुती शासनाने ‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची आवश्यकता आहे.
३. चित्रपटाच्या तिकिटाचे दर न्यून झाल्यास महाराष्ट्रातील समस्त युवक, विद्यार्थी आणि सामान्य जनता हा चित्रपट पाहू शकेल. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोचेल. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन अन् संवर्धन होईल.
४. भविष्यातही असे ऐतिहासिक चित्रपट निर्माण करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि निर्माते प्रेरित होतील.