विविध प्रकारच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या संदर्भातील संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ज्योतींच्या स्पंदनांविषयी केलेले अद्वितीय संशोधन !

‘सांजवेळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोति, श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र इत्यादी म्हणण्याची आपली परंपरा आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगातही ही परंपरा टिकून आहे. देवापुढे तेलाचा दिवा किंवा तुपाचे निरांजन लावतात. तसेच वाढदिवस, धार्मिक विधी यांसारख्या प्रसंगी व्यक्तीचे औक्षण केले जाते. गत काही वर्षांपासून बहुतांश लोक वाढदिवस केक कापून आणि मेणबत्ती विझवून साजरा करतांना आढळतात. काही जण दिवाळीत पारंपरिक मातीच्या पणत्यांऐवजी मेणाच्या पणत्या किंवा काही ठिकाणी तर चक्क मेणबत्त्याच लावतांना आढळतात. ‘मेणबत्ती, मेणाची पणती, मातीची पणती, तेलाचा दिवा आणि तुपाचे निरांजन यांच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या काय भेद आहे ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. चाचण्यांतील नोंदींचे विवेचन

या प्रयोगात तेलाचा दिवा अन् पारंपरिक मातीची पणती यांत तिळाचे तेल अन् तुपाच्या निरांजनात देशी गायीचे तूप घातले होते. हाताने वळलेली कापसाची वात घालून ते तीनही प्रकारचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. त्यानंतर मेणबत्ती आणि मेणाची पणती पेटवून त्यांचीही छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. मेणबत्ती आणि मेणाची पणती यांच्या ज्योतींतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे; याउलट मातीची पणती, तेलाचा दिवा अन् तुपाचे निरांजन यांच्या ज्योतींतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : मेणबत्ती आणि मेणाची पणती यांच्या ज्योतींमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. याउलट मातीची पणती, तेलाचा दिवा आणि तुपाचे निरांजन यांच्या ज्योतींमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

वरील नोंदींवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१ अ १. मेणबत्ती आणि मेणाची पणती यांच्या ज्योतींतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात. मेणबत्ती तमोगुणी पदार्थांपासून बनलेली असल्याने तिच्यात मूलतःच तमोगुणी स्पंदने असतात. ती पेटवल्यावर तिच्यातून तमोगुणी स्पंदनांचे वेगवान प्रक्षेपण चालू होते. त्यामुळे सभोवतालचे वातावरण दूषित बनते. दिवाळीत लोक मेणाच्या पणत्या किंवा मेणबत्त्या लावतात, तसेच वाढदिवस मेणबत्ती पेटवून अन् तिच्यावर फुंकर मारून साजरा करतात, तेव्हा त्यांच्यावर या त्रासदायक स्पंदनांचा नकारात्मक परिणाम होत असतो. सर्वसाधारण मनुष्य साधना करत नसल्याने त्याला ही सूक्ष्म स्पंदने कळत नाहीत. यामुळे वरकरणी दिसायला आकर्षक किंवा सोयीची वाटणारी वस्तू प्रत्यक्षात आध्यात्मिकदृष्ट्या किती हानीकारक ठरू शकते, याची कल्पनाच सर्वसाधारण मनुष्याला नसते. त्यामुळे त्याच्याकडून अशा अयोग्य कृती होतांना आढळतात.

१ अ २. मातीची पणती, तेलाचा दिवा आणि तुपाचे निरांजन यांच्या ज्योतींतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : सर्वसाधारणतः तेलाच्या दिव्यातून रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण होते; परंतु तिळाच्या तेलाच्या दिव्यातून काही प्रमाणात सत्त्व लहरींचे प्रक्षेपण होते. म्हणून इतर तेलांच्या तुलनेत तिळाच्या तेलाचा दिवा अधिक सात्त्विक असतो. मातीची पणती मूलतः सात्त्विक आहे. तिच्यात तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून ती प्रज्वलित केली असल्याने तिच्या ज्योतीतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. कोणत्याही तेलापेक्षा तुपाचा (देशी गायीच्या शुद्ध तुपाचा) दिवा सर्वांत सात्त्विक आहे; कारण तुपामध्ये देवतेच्या सात्त्विक लहरी आकृष्ट करून घेण्याची आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता जास्त आहे.

२. ‘धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम मानवाच्या हिताचे आहेत’, हे लक्षात घ्या !

देवापुढे प्रतिदिन तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल, तर किमान सणासुदीच्या दिवशी तरी तुपाचा दिवा लावू शकता आणि अन्य दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. दिवाळीत मेणबत्ती किंवा मेणाची पणती याऐवजी मातीच्या पणत्यांमध्ये तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून त्या प्रज्वलित करा, जेणेकरून त्यांच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यमय स्पंदनांचा आपल्याला लाभ होईल, तसेच वाढदिवस, धार्मिक विधी इत्यादी प्रसंगी तुपाच्या निरांजनाने औक्षण करा, जेणेकरून औक्षण करून घेणार्‍याला सात्त्विकतेचा लाभ होईल.

थोडक्यात ‘धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम मानवाच्या हिताचे आहेत’, हे लक्षात घेऊन आचारधर्माचे यथायोग्य पालन करा आणि त्यातून मिळणार्‍या सात्त्विकतेचा लाभ करून घ्या.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.२.२०२५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.