Ulhasnagar New Born Baby Sold : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून जन्मलेल्या बाळाची १० सहस्र रुपयांत विक्री !

उल्हासनगर येथील घटना

(‘लिव्ह इन रिलेशनशिप’म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे)

ठाणे : उल्हासनगर येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या २१ वर्षीय तरुणीने तिच्या १ महिन्याच्या बाळाला कळवा येथील एका कुटुंबाला कायदेशीर प्रक्रिया न करता केवळ १० सहस्र रुपयांत दत्तक दिले. हे उघड झाल्यावर तिने तिच्या बाळाला परत देण्याची मागणी केली आहे.

ती गर्भवती झाल्यावर प्रियकराने बाळाला सांभाळण्याचे वचन दिले; पण बाळाचा जन्म झाल्यावर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला सांभाळण्यास नकार दिला. (असे असेल, तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहायचेच कशाला ? – संपादक) दोन्हीकडच्या पालकांनी गरजू कुटुंबाला बाळ दत्तक देण्याचे ठरवले. उल्हासनगर येथील ‘सखी’ केंद्राला याविषयी कळल्यावर कळव्यातील संबंधित कुटुंबियांकडून बाळाला कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी बाळाचे खरे पालक, तसेच बेकायदेशीररित्या दत्तक घेणारे पालक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

हे आहेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम ! हिंदु धर्मातील विवाहसंस्था म्हणजे अनेक गोष्टींचा सर्वांगसुंदर मिलाप आहे. याद्वारे प्राप्त होणार्‍या श्रेष्ठ गृहस्थाश्रमात दायित्व झिडकारले जात नाही, तर ती आनंदाने पार पाडली जातात; मात्र पाश्चात्त्य विकृतीच्या आधीन जाऊन ‘लिव्ह इन’चा अवलंब करणे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणेच होय !