सध्या पाश्चात्त्य विकृतीतून आलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेम आणि आपुलकीचा दिवस साजरा करण्यासाठी अनेक जण सिद्धता करतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ का साजरा केला जातो ? या दिवसाचा इतिहास काय आहे ?’, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. विविध संकेतस्थळांवर ‘व्हॅलेंटाईन डे’चा इतिहास ‘मिस्ट्री’ (गूढ) म्हणून संबोधला गेला आहे. तिसर्या शतकात रोम येथे व्हॅलेंटाईन नावाचा एक पाद्री होता. त्या काळातील ‘क्लॉडीयस २’ नावाच्या राजाने एक नियम लागू केला की, विवाहित पुरुषांपेक्षा अविवाहित पुरुष चांगले सैनिक असतात; म्हणून युवा मुलांनी विवाह करू नये. व्हॅलेंटाईनला हे अयोग्य वाटले आणि त्याने राजाच्या नियमाचे पालन न करता लपूनछपून प्रेमी युगुलांचे लग्न लावणे चालू केले. जेव्हा राजा ‘क्लॉडीयस २’ला हे कळले, तेव्हा त्याने व्हॅलेंटाईनला ठार मारण्याचा आदेश दिला. त्याची आठवण म्हणून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो.
१. कथित ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे मुलींवरील अत्याचारामध्ये वाढ होणे
‘व्हॅलेंटाईन डे’चे वेड आपल्या भारतियांना इतके आहे की, पाश्चात्त्यांनाही आश्चर्य वाटेल, असे ७ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिदिन एक ‘डे’ (दिवस) साजरा केला जातो. एवढे दिवस विदेशातही असे ‘डे’ साजरे केले जात नाहीत. यावरूनच भारताची सामाजिक स्थिती किती खालावली आहे ? हे लक्षात येते. एका इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार ‘व्हॅलेंटाईन डे’च्या काही आठवड्यांपूर्वीच ‘रोड रोमिओ’ (मुलींना रस्त्यावर त्रास देणारी मुले) बॉलीवूड चित्रपटातील नायक-नायिका यांच्या भेटीप्रमाणे वागायला लागतात आणि मुलींना त्रास देतात. या काळात मुलींना घरातून बाहेर निघणे कठीण जाते. मुलाच्या इच्छेला नाकारल्यास काही मुले शिव्या देणे, शारीरिक आणि मानसिक छळ करणे, धमकावणे, बलात्कार करणे, पळवून नेणे, तोंडावर आम्ल (ॲसिड) फेकणे अशा प्रकारे मुलींना त्रास देतात. अशा प्रकारच्या घटना एरव्हीही होतात; पण या काळात त्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समजते.
२. समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा दिवस !
त्यामुळे केवळ बळजोरीने असे दिवस साजरे केल्याने आपल्यात प्रेम आणि मैत्री आपोआप कशी काय वाढणार ? आपल्यात प्रेमभाव वाढण्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे काही काळाने आपल्यात प्रेमभाव निर्माण होतो. ‘इंटरनॅशनल बिझिनेस टाइम्स’ या दैनिकानुसार ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘सुसाईड हेल्पलाईन’ला (आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाने चालू केलेली दूरभाष यंत्रणा) सर्वाधिक भ्रमणभाष येतात. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याने निर्माण होणारा एकाकीपणा आणि भग्न मानसिकता ही त्यामागची कारणे आहेत. असा हा समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा आणि अनेकांना निराशेत घेऊन जाणारा दिवस साजरा करण्यामागे आपण का लागलो आहोत ? याचा सारसार विचार व्हायलाच हवा.
– राजेश सावंत, मुंबई. (८.२.२०२५)