वेदांअन्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात ! – अभिनेते राहुल सोलापूरकर

अभिनेते राहुल सोलापूरकर

पुणे – ‘ब्रह्म जाणणारा, तो ब्राह्मण’ या वेदांमध्ये असलेल्या वचनाप्रमाणे ‘पुष्कळ अभ्यास केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात’, असे वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केल्याने ते अडचणीत आले आहेत. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सचिन खरात यांनी ‘सोलापूरकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात त्यांना कुठे फिरू देणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. काहीही करून ब्राह्मणत्व टिकवायला हवे, या जाणिवेतून महाराष्ट्रात काहीजण त्रस्त झाले आहेत, असे पुणे महापालिकेचे माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांचा हिंदु धर्माचा अभ्यास नक्कीच अधिक होता; मात्र त्यांनी हिंदु धर्म नाकारला. त्यामुळे ब्राह्मणत्वाने ग्रस्त झालेले काहीजण त्यांना ब्राह्मण ठरवायला निघाले असून त्यांचा निषेध आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सोलापूरकर यांच्या निवासस्थानी बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे.