कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवण्याविषयी मी गंभीर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन (अमेरिका) – कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवण्याच्या संदर्भात मी गंभीर आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केले. ट्रम्प म्हणाले की, मला वाटते की ५१ वे राज्य म्हणून कॅनडाची स्थिती पुष्कळ चांगली असेल. याचे कारण कॅनडामुळे अमेरिका प्रतिवर्षी २०० अब्ज डॉलर्स गमावते. आपण कॅनडाला २०० अब्ज डॉलर्सचे अनुदान का देत आहोत ? यापुढे मी हे होऊ देणार नाही.

ट्रम्प पुढे म्हणाले की, कॅनडा अमेरिकेविना जगू शकत नाही. कॅनडाने यापुढे अमेरिकी संरक्षणावर अवलंबून राहू नये. कॅनडा त्याच्या सैन्यावर अधिक खर्च करत नाही. कारण त्याला वाटते की, अमेरिका त्याचे संरक्षण करील; पण आता हे शक्य होणार नाही. यापूर्वी ७ फेब्रुवारीला कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी व्यापारी आणि कामगार नेत्यांसमवेत झालेल्या गोपनीय बैठकीत सांगितले होते, ‘कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवण्याची ट्रम्प यांची चर्चा खरी होती. ते कॅनडाला अमेरिकेत विलीन करण्याच्या त्यांच्या योजनेबद्दल गंभीर आहेत. ट्रम्प यांना कॅनडाची नैसर्गिक साधनसंपत्ती हवी आहे आणि त्यासाठी ते आम्हाला त्यांच्या देशात समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत.’