Bijapur Naxal Encounter: बिजापूर (छत्तीसगड) येथे ३१ नक्षलवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण

बिजापूर (छत्तीसगड) – येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्याच वेळी २ सैनिकांना वीरमरण आले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेली या वर्षातील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी १२ जानेवारीला झालेल्या चकमकीत ३ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले होते.

चालू वर्षात आतापर्यंत ६२ नक्षलवाद्यांना चकमकीत ठार मारण्यात आले आहे, तर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढतांना ११ सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच या वर्षात बिजापूर येथील ५ जणांसह किमान ९ जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. छत्तीसगड राज्यातील ‘अबुझमाड’ या डोंगराळ आणि जंगलांनी वेढलेल्या क्षेत्राला लागून असलेले इंद्रावती राष्ट्रीय उद्यान नक्षलवाद्यांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे मानले जाते. २ सहस्र ७९९ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. वर्ष १९८३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते.