१. कुंभमेळ्याविषयीची पुराणातील कथा
कुंभमेळ्याच्या वेळी गंगेचे स्नान आध्यात्मिक प्रगतीसाठी विशेषतः उपयुक्त का आहे ?, याचे कारण प्राचीन काळापासून उत्तर भारतातील विद्यमान स्थानांशी जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांमध्ये दिले आहे. देव आणि दैत्य यांनी क्षीरसागराचे जोरदार मंथन करून अमरत्व देणारे अमृत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी जेव्हा अमृताने भरलेला कुंभ बाहेर आला, तेव्हा दैत्यांकडून देवतांकडून अमृत मिळवण्यासाठी पाठलाग चालू झाला. इंद्राच्या मुलाने, म्हणजेच जयंताने अमृताचा कुंभ कह्यात घेतला होता आणि दैत्य त्याचा जोरदार पाठलाग करत त्याच्या मागे लागले. सूर्य, चंद्र आणि गुरु यांनी देवांच्या संरक्षकांची भूमिका बजावली अन् विशिष्ट स्थानांवरून त्यांच्या बाजूने परिणाम प्रभावित केला. शेवटी हा कुंभ देवांकडे सुरक्षितपणे पोचेपर्यंत १२ दिवस लागले. पौराणिक कथांनुसार या कुंभातून अमृताचे काही थेंब भारतातील ४ ठिकाणी पडले आणि ही स्थाने विशेष पवित्र झाली. त्यामुळे हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी १२ वर्षांतून एकदा कुंभमेळा आयोजित केला जातो. तो साजरा करण्यासाठी लाखो भाविक एकत्र येतात.
२. कुंभमेळ्याविषयी पाश्चात्त्यांऐवजी भारतीय दृष्टीकोन ठेवणे आवश्यक !

कुंभमेळ्याच्या वेळी अनेक धर्मनिष्ठ हिंदू पवित्र नदीत स्नान करण्याचे स्वप्न का पहातात, हे या कथेमुळे स्पष्ट होते. तथापि हे स्पष्टीकरण एखाद्या युरोपीय व्यक्तीला पटवून देऊ शकत नाही. जेव्हा मी गंगेच्या किनार्यावर चालत गेले, कंबरेपर्यंत पाण्यात उभे राहून बोटांनी नाक धरून गुडघे वाकवून गंगेत डुबकी मारतांना पाहिले, तेव्हा सत्य जाणून घेण्यासाठी असे करून बघावे लागते. मला खात्री आहे की, संबंधित ज्योतिषीय नक्षत्र गंगेच्या पाण्यावर काही सूक्ष्म परिणाम करून ते पाणी भारित होते कि नाही ? याची पडताळणी करता येत नाही किंवा ते खोटे मानता येत नाही. भारतात ७ वर्षे राहिल्यानंतर ‘वैज्ञानिक दृष्टीकोनातून’ अशा समजूतीला मूर्खपणा मानणार्या केवळ पाश्चिमात्य दृष्टीकोनाचा विचार न करता, भारतीय दृष्टीकोनाचा शक्य तितका विचार करण्याएवढी मी आधीच व्यापक मनाची होते. भारतातील ऋषींना आणि त्यांच्या परंपरेला मनुष्य अन् ब्रह्मांड सूक्ष्म स्तरावर परस्परांवर अवलंबून रहाण्याविषयी बरेच काही ठाऊक आहे, असा भारतियांचा विश्वास आहे अन् ते योग्य असतील. विज्ञान प्राचीन ज्ञानाच्या अधिकाधिक अंतर्दृष्टींना मान्यता देत रहाते. खरे सांगायचे, तर पाश्चिमात्य लोकांची जी श्रद्धा त्यांना ख्रिस्ती चर्चमधील बाप्तिस्म्याविषयी आहे, त्याच पातळीची भारतीय श्रद्धाही आहे, हे स्वीकारले पाहिजे. कदाचित् त्यापेक्षाही उच्च पातळीची असेल; कारण कुणाही भारतियाने गंगेत स्नान केले नाही, तर त्याला चिरंतन शिक्षेची धमकी कुणीही कुणाला देत नाही.
३. कुंभमेळ्यात उपस्थित साधूंविषयीचा माझा अनुभव
कुंभमेळ्याविषयी एक आकर्षण होते. अनेक साधू नग्न होते. त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत केवळ भस्म लावलेले होते. इतरांनी भगव्या रंगाचे, कधी कधी पांढरे किंवा काळेही कपडे परिधान केले होते. त्यांच्या कपाळावर रहस्यमय खुणा होत्या. त्यांच्या एका हातात भिक्षा मागण्याचे भांडे, तर दुसर्या हातात लाकडी काठी आणि काहींच्या हातात त्रिशूळ होते. त्यांची केशरचना विलक्षण होती. जरी त्यांची डोकी मुंडण केलेली नव्हती, तरी त्यांचे केस भस्मामध्ये अनेक थरांमध्ये डोक्यावर गुंडाळलेले होते किंवा काही जणांचे केस कंबरेपर्यंत पोचलेले होते. कुंभमेळ्याच्या वेळी माझ्या लक्षात आले की, ते सर्वजण संत होण्याच्या जवळ नव्हते, ही वस्तूस्थिती होती. ज्यांनी सत्याच्या शोधासाठी पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे स्वतःचे जीवन समर्पित केले होते, असे काही खरे लोकही कुंभमेळ्यात आले होते. त्यांच्यामध्ये असे काही लोक असतील, जे त्यांच्या शोधाच्या शेवटी आले असतील आणि त्यांना जीवनाचे सार सापडले आहे, असे वाटत असेल.
४. जागृत चेतनेच्या पातळीवर जगणारे साधू : एक विलक्षण अनुभूती
कुंभमेळ्यात मला खरोखरच पुष्कळ प्रभावी व्यक्तीमत्त्वे भेटली नाहीत, हे मान्य आहे; परंतु काही प्रकरणांमध्ये कुणीतरी त्याचे किंवा तिचे स्वतःचे जीवन सखोल, अधिक जागृत पातळीच्या चेतनेतून जगले, याची मी कल्पना करू शकते. उदाहरणार्थ एकदा मी रस्त्याच्या कडेला एका चहाच्या दुकानासमोर एका छोट्या लाकडी बाकावर बसले होते. डोक्यावर टॉवेल गुंडाळलेला एक वयस्कर गृहस्थ माझ्या शेजारी बसले. मी त्यांच्यापासून थोडे दूर गेले; कारण त्यांचे कपडे अस्वच्छ दिसत होते. त्यांच्या खांद्यावर त्याच गलिच्छ पांढर्या रंगाचे उपरणे होते. त्याच वेळी तिथे एक कुत्री आणि तिचे पिल्लू आमच्या बाकाजवळ उभे होते अन् तिने आमच्याकडे एका अपेक्षेने पाहिले. मी आणि तो वयस्कर व्यक्ती आम्ही दोघे एकाच क्षणी तिच्याकडे वळलो अन् मला आश्चर्य वाटले की, त्या वयस्कर व्यक्तीच्या डोळ्यातून करुणा चमकली. आता मला अचानक त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले आणि ‘तो गरीब दिसत असल्याने त्याच्या चहासाठी पैसे देणे योग्य आहे का ?’, असा मला प्रश्न पडला. इतक्यात माझी मैत्रीण मेलिता ही माझ्याकडे येऊन बोलत होती, त्याच वेळी ती व्यक्ती पैसे देऊन निघून गेली. त्यानंतर मेलिताने त्या व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली, ‘त्या माणसाकडे पहा. तो ज्ञानी आहे, असा येथील लोक दावा करतात. जरी तो गरीब असला, तरी तो नेहमीच शांत, दयाळू आणि स्वस्थ असतो.’
दुसर्या दिवशी आनंदमयी माता यांची समाधी असलेल्या मंदिराच्या येथून मेलिता आणि मी पुढे जात असतांना माझ्या मनात त्या वयस्कर व्यक्तीविषयी विचार आला अन् मला त्यांना पुन्हा एकदा पहाण्याची इच्छा झाली. तितक्यात माझ्या पुढ्यातून कुणीतरी गेले; पण त्यांच्या डोक्यावर टॉवेल नव्हता; म्हणून मी तिकडे लक्ष दिले नाही. अचानक मला त्या व्यक्तीचे पाय पाहून माझ्या लक्षात आले की, ती व्यक्ती तीच आहे. त्याच क्षणी ती व्यक्ती माझ्याकडे वळली आणि माझ्याकडे पाहून हसली.
५. नागा साधू होऊ पहाणार्या तरुणाविषयी आलेला अनुभव
पुढे गेल्यावर एक तरुण साधू माझ्याकडे आला आणि त्याने ‘मी कुठून आले ?’, असे अस्खलित इंग्रजीमध्ये विचारले. त्याने केवळ लंगोट घातलेली होती आणि तो नुकताच नागा साधू झाल्याचे त्याने मला सांगितले. आदल्या दिवशी मी पाहिले होते की, काही शेकडो तरुण गंगेच्या काठावर बसले होते. त्यांची डोकी नव्याने मुंडण करून त्यांनी लंगोट घातलेली होती. त्यांनी ‘संन्यास घेतला’, म्हणजे त्यांनी जगातील सर्व सुखांचा त्याग करण्याची आणि यापुढे संपत्ती, कुटुंब अन् पद यांची स्वप्ने न पहाता त्यांचे जीवन पूर्णपणे देवाच्या शोधासाठी समर्पित करण्याची शपथ घेतली होती. त्या तरुणांपैकी एक तरुण माझ्यासमोर उभा होता. त्याने ‘नागा साधू होण्याचे का ठरवले ?’, असे मी त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘मला देवाशी एकरूप होण्यासाठी हिमालयाच्या गुहेत ध्यान करायचे आहे.’ त्याच्या भेटीच्या संधीचा उपयोग करून ‘तो मला त्याच्या गुरूंशी ओळख करून देऊ शकेल का ?’, असे त्याला विचारले. त्यावर त्याने लगेच होकार दिला.
६. नागा साधूंनी परकीय मुसलमानांशी संघर्ष करणे
नागा साधू स्वतःला शिवाचे योद्धा मानतात. त्रिमूर्तींमध्ये ब्रह्मा हा निर्माता, विष्णु संरक्षक आणि शिव हा विनाश करणारा आहे. दुसरीकडे शिव हा सर्वोच्च आहे असे मानले जाते. मुसलमान आक्रमणकर्त्यांनी ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत हिंदूंचे जीवन कठीण केले आणि इस्लाम धर्म न स्वीकारणार्या लाखो हिंदूंची हत्या केली. अशा क्रूर मुसलमान आक्रमकांविरुद्ध नागा साधूंनी लढा दिला.
एप्रिल १९८६ मध्ये हरिद्वारमध्ये पूर्ण कुंभमेळा साजरा केला जाणार, असे मी जेव्हा ऐकले, तेव्हा मला तिथे जायचे होते. जेव्हा भारताच्या कानाकोपर्यातून लाखो यात्रेकरू गंगेवर या उत्सवात पोचण्यासाठी पुष्कळ त्रास सहन करून येतात, तेव्हा त्यामागे निश्चितच एक कारण असेल, असे मला जाणवले. खरेतर याची २ कारणे आहेत.
अ. पहिले, म्हणजे कुंभमेळ्याच्या शुभ मुहुर्तावर गंगेत स्नान करणे, हे एक मोठे आकर्षण आहे; कारण ते स्नान अतिशय शक्तीशाली, आंतरिक शुद्धीकरण करणारे आणि आध्यात्मिक विकासाला चालना देणारे आहे, असे मानले जाते.
आ. दुसरे, म्हणजे वैदिक काळातील प्राचीन ज्ञानी स्त्रिया आणि पुरुष यांचे उत्तराधिकारी असलेल्या महान ऋषींच्या उपस्थितीचा लाभ होण्याची शक्यता असते.
कुंभमेळा हा ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी समर्पित केले आहे, त्या अध्यात्माचे आधारस्तंभ मिळण्याचे स्थळ आहे. आजही सहसा हिमालयातील गुहांमध्ये असलेले संन्यासी आणि भिक्षा मागत देशभरात भटकंती करणारे साधू (भिक्षू) हे आदर्श मानले जातात. जगात बंधनात आहोत, असे वाटणार्यांना ते स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची स्वप्ने यांना मूर्त स्वरूप देतात. मी वर्ष १९८६ आणि २०१० मध्ये हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याला गेले होते. या दोन्ही वेळी मला आलेले अनुभव येथे देत आहे.
लेखिका : मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासिका, जर्मनी.