संपादकीय : चीनची तांत्रिक एकाधिकारशाही !

चीनने २७ जानेवारीला ‘डीपसीक’ हे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कार्यान्‍वित केले. याचा राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर बराच परिणाम झाला. मुख्‍य परिणाम म्‍हणजे अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला. ‘एनविडिया’ आस्‍थापनाची एकूण ६०० बिलियन डॉलर्सची हानी झाली. अमेरिकेच्‍या तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर बाजाराची ३ टक्‍क्‍यांहून अधिक घसरण झाली. ‘डीपसीक’च्‍या आधी ‘चॅटजीपीटी’चा बाजारात अधिक बोलबोला होता; पण ‘चॅटजीपीटी’चे स्‍थान मागून आलेल्‍या ‘डीपसीक’ने डळमळीत केले आणि अग्रभागी स्‍वतःचे वर्चस्‍व प्रस्‍थापित केले. याआधी ‘एआय मॉडेल’, चिप आणि इतर तंत्रज्ञान यांसाठी पुष्‍कळ व्‍यय येत होता; पण आता ‘डीपसीक’ने त्‍याला फाटा देत अल्‍प किमतीत तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘एनविडिया’ हे आस्‍थापन याआधी ही खर्चिक सामुग्री सिद्ध करत होते; पण ‘आता डीपसीकने जणू त्‍याला घरचा रस्‍ताच दाखवला आहे’, असे म्‍हणता येईल ! चीन काय केवळ डीपसीक आणून थांबलेला नाही. त्‍याच्‍या ‘अलीबाबा’ या आस्‍थापनाने ‘क्‍वेन २.५ मॅक्‍स’ हे ‘एआय’चे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. ‘डीपसीक एआय’, ‘जीपीटी ४ ओ’ आणि ‘मेटा’च्‍या ‘लामा’ यापेक्षाही हे नवे मॉडेल प्रभावी असल्‍याचे चीनचे म्‍हणणे आहे. तंत्रज्ञानाच्‍या प्रभावी युगात चीन स्‍वतःचा विस्‍तारवाद आणि वर्चस्‍ववाद यांच्‍या बळावर सर्वांसमोर मोठा प्रतिस्‍पर्धी होऊ पहात आहे. त्‍यामुळे या बाजारात किमतीचे मोठे युद्ध प्रतिदिन निर्माण होत आहे. चीनने जाणूनबुजून हे सर्व निर्माण करणे अधिक धोकादायक आहे. ‘अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला’, हे वृत्त जसे पसरले, तशी सगळ्‍याच राष्‍ट्रांना खडबडून जाग आली. ‘डीपसीक हे इतके अल्‍प किमतीचे तंत्रज्ञान अस्‍तित्‍वात येईल, अशी कल्‍पनाच कधी केली नव्‍हती. त्‍यामुळे आम्‍हालाही आश्‍चर्याचा धक्‍का बसला’, असे मत काही तज्ञांनी व्‍यक्‍त केले.

डीपसीक चीनधार्जिणे !

जगातील सर्वांत मोठ्या प्रसारण संस्‍थेने ‘डीपसीक’ला ‘४ जून १९८९ या दिवशी चीनमधील तिआनमेन चौकात काय झाले होते ?’ असा प्रश्‍न विचारला होता. त्‍या दिवशी चीनच्‍या साम्‍यवादी सरकारच्‍या धोरणांविरोधात लाखो लोकांनी आंदोलन केले होते; पण सरकारने गोळीबार करत हे आंदोलन चिरडले होते. चीनने यात ठार झालेल्‍यांची संख्‍या न्‍यून सांगितली होती; पण अनेकांच्‍या मते शेकडो किंवा सहस्रो लोक यात ठार झाले होते. इतक्‍या मोठ्या हत्‍याकांडाविषयीची घटना चिनी सरकारच्‍या विरोधात जाणारी असल्‍याने डीपसीकने उत्तर देत सांगितले, ‘मला क्षमा करा. मी या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकत नाही. मी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’वर आधारित साहाय्‍यक असून केवळ उपयुक्‍त आणि कोणतीही हानी न पोचवणारी उत्तरे देण्‍यासाठी माझी रचना करण्‍यात आली आहे.’ प्रत्‍यक्ष चीनमध्‍येही या हत्‍याकांडाविषयी चर्चा करणे संवेदनशील समजले जाते. सामाजिक माध्‍यमांवरील याविषयीच्‍या पोस्‍टही काढण्‍यात आल्‍या आहेत. चीनमधील नव्‍या पिढीला तर या घटनेविषयी तितकीशी माहितीही नाही. यावरूनच डीपसीक हे सर्वसमावेशक तंत्रज्ञान नसून चीनधार्जिणे असल्‍याचे उघड होते. चीनला डागाळणार्‍या घटनांविषयी चीन बोलत नाही आणि कुणालाही बोलू देत नाही, हेच खरे ! अशा चीनधार्जिण्‍या तंत्रज्ञानाची मक्‍तेदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिला आवर कोण घालणार ? महासत्ता असणार्‍या अमेरिकेलाही चीनच्‍या समोर झुकावे लागते, यावरूनच ‘चीनचा एकाधिकारशाहीचा वारू किती चौफेर उधळत असतो’, हेच दिसून येते.

अमेरिका पायउतार !

‘एआय’ने (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’ने) तंत्रज्ञानाच्‍या विश्‍वात पाऊल टाकून काही कालावधी उलटला; पण अजूनही जगभरातील सर्वांपर्यंत त्‍याची माहिती किंवा आवश्‍यकता अपेक्षित प्रमाणात पोचलेली नाही. इतक्‍यातच आता डीपसीकचा झालेला शिरकाव, म्‍हणजे तंत्रज्ञान तज्ञांसाठी डोकेदुखीच ठरणार आहे. त्‍यांच्‍या समोर मोठे आव्‍हान नव्‍हे, तर संकटच निर्माण झालेले आहे. आधी कृत्रिम बुद्धीमत्तेच्‍या क्षेत्रात अमेरिकेच्‍या नावाची चलती होती आणि तिचे वर्चस्‍व टिकून होते. प्रचंड भांडवलही त्‍यात ओतले जात होते; पण आता चीनने हे तंत्रज्ञान विकसित करत अमेरिकेला पायउतार केले आहे. हे सर्व पहाता आता चीन अमेरिकेच्‍या पुढे जाणार का ? तंत्रज्ञानाच्‍या विकासाच्‍या क्षेत्रात अमेरिका आता काय धोरण अवलंबणार ? चीनला शह देण्‍याचा प्रयत्न अमेरिका करील का ? अमेरिका तिचा गडगडलेला शेअर बाजार पुन्‍हा सुस्‍थितीत आणेल; पण चीनचा वारू कसा रोखणार ? चीनच्‍या विस्‍तारवादासमोर अन्‍य राष्‍ट्रांचा टिकाव लागेल का ? महासत्ता होऊ पहाणारा भारतही चीनच्‍या या तंत्रज्ञानाच्‍या संदर्भात कोणती पावले उचलणार आहे ? चीनच्‍या या आव्‍हानाकडे भारत कोणत्‍या दृष्‍टीने पहातो ? हे आणि यांसारख्‍या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधणे अपरिहार्य आहे.

चीनचा सामना कसा करावा ?

महत्त्वाकांक्षी चीनचे वाढते प्रस्‍थ पहाता त्‍याला प्रभावीपणे सामोरे जाणे आवश्‍यक आहे. चीनला ‘तोडीस तोड’ उत्तर द्यायचे असेल, तर तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक मेहनत घ्‍यावी लागणार आहे. डीपसीककडे केवळ तंत्रज्ञान म्‍हणून न पहाता त्‍याचा संबंध सायबर सुरक्षेशीही तितकाच आहे. ती सुरक्षा धोक्‍यात आली, तर भारतासह सर्वच राष्‍ट्रे संकटात सापडतील. सध्‍याची सायबर सुरक्षा चीनमुळेच धोकादायक झाली आहे. त्‍यात अशा तंत्रज्ञानांची भर पडणे, हे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. धूर्त चीनच्‍या अशा तंत्रज्ञानाच्‍या आहारी जाणे, म्‍हणजे एखाद्या आपत्तीला आमंत्रण देण्‍याप्रमाणेच आहे. तज्ञांनी याकडे डोळेझाक करून चालणार नाही. सतर्कतेने पावले उचलणे आवश्‍यक आहे. डीपसीकमधील माहिती खरोखर गुप्‍त राखली जाते का ? कि ती चीनला पुरवली जाते, याविषयीची कोणतीही माहिती अद्याप उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे प्रत्‍येकाने अशा तंत्रज्ञानाचा वापर काळजीपूर्वक आणि दायित्‍वाचे भान राखत करायला हवा. तसे न झाल्‍यास शत्रूचे तंत्रज्ञान वापरून त्‍याच्‍या आहारी जाऊन स्‍वतःची सुरक्षितता धोक्‍यात आणण्‍यासाठी स्‍वतःच्‍याच पायावर कुर्‍हाड मारण्‍याचा प्रयत्न केल्‍यासारखे होईल. तंत्रज्ञानाच्‍या स्‍पर्धेत किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेच्‍या शर्यतीत टिकून रहाण्‍यासाठीच सजग राहून आणि भान ठेवून प्रयत्न करायला हवेत. चीनच्‍या विस्‍तारवादी धोरणाची खुमखुमी काही न्‍यून होणार नाही. त्‍यामुळे भारताने याविरोधात वेळीच शहाणपणाचे धोरण आखावे. कृत्रिम बुद्धीमत्ता हे तंत्रज्ञान जरी विज्ञानाच्‍या जोरावर विकसित झालेले असले, तरी मानवी बुद्धीमत्ता, म्‍हणजे देवाने मानवाला दिलेली एक अमूल्‍य देणगी आहे. त्‍यामुळे ती जोपासत मानवाने सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून राष्‍ट्रघातकी तंत्रज्ञानाच्‍या विरोधात आक्रमक रणनीती ठरवायला हवी.

चीनच्‍या विस्‍तारवादी धोरणाची खुमखुमी न्‍यून होणार नसल्‍याने भारताने वेळीच शहाणे होऊन आक्रमक रणनीती ठरवावी !