त्रिवेणी संगम क्षेत्रात येणार्‍या भाविकांची संख्या मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर !

प्रयागराज – प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभपर्वात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. यावर्षी महाकुंभात किती भाविक आले आहेत ?, हे मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने महाकुंभपर्वात येणार्‍या भाविकांची संख्या मोजण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर चालू केला आहे. या कॅमेर्‍यांद्वारे त्रिवेणी संगमावरील भाविकांची संख्या अंदाजे मोजली जात आहे. प्रयागराजमधील ४८ घाटांवर प्रति घंट्याला स्नान करणार्‍यांच्या गर्दीचे मूल्यांकन एक विशेष पथक करत आहे.

वेळोवेळी गर्दीचे मूल्यांकन घाटांवर होत आहे. याखेरीज ड्रोनचा वापर करून विशिष्ट क्षेत्रातील गर्दीच्या घनतेचे माप घेतले जात आहे. एक विशेष ॲपही सिद्ध करण्यात आले आहे, ज्याद्वारे संगमावरील भाविकांची संख्या त्यांच्या भ्रमणभाषच्या माध्यमातून शोधली जात आहे. यासमवेतच स्थानिक गुप्तचर पथकही गर्दीच्या संख्येचे मूल्यांकन करत आहे. अशा तंत्रज्ञानावर आधारित गणनेसह महाकुंभपर्वातील भाविकांनी गंगास्नान केलेल्या संख्येची अचूक मोजणी केली जात आहे. येथील पवित्र त्रिवेणी संगमात आतापर्यंत ६ कोटींहून भाविकांनी स्नान केले आहे.