मडगाव, १४ जानेवारी (वार्ता.) – मडगाव येथे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करून सांडपाणी नाल्यात सोडणार्या २१ दुकानांवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून या दुकानांना टाळे ठोकले आहे. यामध्ये उपाहारगृहे आणि अन्य दुकानांचा समावेश आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाल्यांमध्ये सांडपाणी सोडल्याविषयी मडगावमधील ४६ दुकानांना नोटीस जारी केली होती. सासष्टीचे मामलेदार विनोद दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालू करण्यात आली आहे. पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन केलेल्या दुकानांच्या मालकांना ‘त्यांनी त्यांचे
व्यवसाय बंद करावेत, नाहीतर पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल’, असा आदेश देण्यात आला असल्याची माहिती गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘मडगावातील एकूण ४६ आस्थापने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत २१ आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहे.’’ प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पडताळणीनंतर ही कारवाई करण्यात आली. मडगावमधील अनेक हॉटेल्स आणि उपाहारगृहे कचरा अन् स्वयंपाकघरातील सांडपाणी वहात्या नाल्यात सोडत असल्याचे आढळून आले आहे.