महाकुंभक्षेत्री ‘चकर्ड प्लेट’च्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रशासनापुढे आव्हान !

(चकर्ड प्लेट म्हणजे नदीपात्रातील वाळूवर चालता येण्यासाठी बसवलेली मोठी लोखंडी प्लेट)

चकर्ड प्लेटच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करतांना कर्मचारी

श्री. सागर गरुड, प्रतिनिधी, प्रयागराज

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री गंगेच्या वाळुमध्ये चकर्ड प्लेटच्या आधारे शेकडो रस्ते सिद्ध करण्यात आले आहेत. या रस्त्यांमुळेच सपूंर्ण महाकुंभपर्वात सुरळीत वाहतूक चालू आहे. मागील आठवडाभरातील वाहतूकीमुळे बहुतांश चकर्ड प्लेटच्या खालील वाळू सरकली आहे. त्यामुळे चकर्ड प्लेट वर-खाली झाल्याने त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. चकर्ड प्लेटच्या खाली वाळू घालून चकर्ड प्लेट समांतर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून शेकडो कर्मचारी चकर्ड प्लेटच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत.

महाकुंभपर्वात विविध शेकडो आखाड्यांचा धान्यसाठा आणि इतर साहित्य ट्रक, ट्रॅक्टर आदी अवजड वाहनांद्वारे पुरवले जाते. ही सर्व वाहतूक चकर्ड प्लेटच्या रस्त्यांवरूनच होत आहे. अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे चकड प्लेटच्या खालील वाळू मोठ्या प्रमाणात सरकत आहे. त्यामुळे अनेक रस्ते उंच-सखल झाले असल्याने दुचाकी वाहनावरून जातांना हबके बसत आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर हातात घेतले आहे. कुंभमेळ्यामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असतांना आणि रस्त्यावरून वाहतूक चालू असतांना चकर्ड प्लेटचे स्क्रू काढून त्याखाली वाळू घालणे, खड्डे बुजवणे, हे काम मोठे जिकरीचे झाले आहे.