सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील ६ आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे या सर्वांना १८ जानेवारीला बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना प्रत्यक्ष उपस्थित न करता ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ प्रणालीद्वारे सहभागी करून घेण्यात आले होते. पोलिसांनी सर्वांसाठी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत.

वाल्मिक कराडच्या जामिनावर २२ जानेवारीला सुनावणी !

खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. याची पुढील सुनावणी आता २० जानेवारीला होणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा असलेला संबंध याचे अन्वेषण करायचे असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयाकडे केली आहे.