‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या विरुद्ध खोट्या तक्रारी करून अपकीर्ती करणार्‍या ‘सिटीझन फॉर जस्टीस अँड पीस’वर कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची तक्रार

उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके (डावीकडे) यांच्याकडे तक्रार देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मंदिरांचे सुव्यवस्थापन सुनिश्चित करण्याच्या उदात्त उद्देशाने २४ ते २५ डिसेंबर २०२४ या काळात शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली होती. तिस्ता सेटलवाड आणि फादर सेर्डिक यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टीस अँड पीस’ या संघटनेने मंदिर परिषदेविरुद्ध खोट्या तक्रारी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी ‘सिटीझन फॉर जस्टीस अँड पीस’वर कारवाई करा, अशी तक्रार हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली.

ही तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी स्वीकारली. या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, एकवीरा मंदिराचे पुजारी श्री. अनिकेत गुरव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.