Naga Sadhu Diksha : नागा साधूंचा दीक्षाविधी पहाण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी !

श्री. सागर गरूड, प्रतिनिधी, प्रयागराज

नूतन नागा साधूंना धर्मध्वजाच्या खाली प्रार्थना सांगतांना पिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरिजी

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या २ सहस्रांहून अधिक नूतन संन्याशांनी १८ जानेवारी या दिवशी प्रयागराज येथे महाकुंभपर्वात नागा साधूंची दीक्षा घेतली. नागा साधूंना दीक्षा देण्याचा कार्यक्रम केवळ कुंभपर्वातच होत असल्यामुळे, तसेच नागा साधूंविषयी कुतहल असल्यामुळे हा दीक्षा सोहळा पहाण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली. श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदजी गिरि यांनी या सर्वांना दीक्षा दिली. पहाटेपासून चालू झालेला हा दीक्षा विधी मध्यरात्री १.३० वाजता गंगास्नानानंतर पूर्ण झाला. यापुढील काही विधी १९ जानेवारी या दिवशी होणार आहेत.
नागा साधूंची दीक्षा घेण्यासाठी आलेल्या नूतन संन्याशांनी दुपारी गंगास्नान केल्यानंतर श्री पंचदशनाम जुना आखाड्यामध्ये येऊन दिवसभर विविध धार्मिक विधी केले. रात्री श्री पंचदशनाम जुना आखाड्यामध्ये आगमन झाले. मध्यरात्री अनुमाने १ वाजता धर्मध्वाजाखाली सर्व नूतन संन्याशांनी स्वामी अवधेशानंदजी यांच्या उपस्थितीत धर्मरक्षणाच्या कार्यात योगदान देण्याविषयी बळ प्राप्त व्हावे, यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार केला. या वेळी धर्मध्वजाच्या ठिकाणी पेटवलेल्या अग्निकुंडांमध्ये सर्व संन्याशांनी तीळार्पण केले. त्यानंतर मध्यरात्री स्वामी अवधेशानंदजी यांच्यासह सर्व नूतन संन्यासी गंगातीरावर गेले. स्वामी अवधेशानंदजी यांनी ‘ॐ नमो भगवते’ असा उच्चार केल्यानंतर सर्व नूतन संन्याशींनी गंगेमध्ये स्नान केले. त्यानंतर पुन्हा आखाड्यामध्ये येऊन धर्मध्वजाला प्रार्थना केल्यानंतर संन्यास घेतलेले नागा साधू आपापल्या शिबिरामध्ये गेले. दीक्षा घेतलेल्या नागा साधूंमध्ये बालक, अपंग, वृद्ध नूतन संन्याशांही होते.

कडाक्याच्या थंडीत केवळ लंगोटीवर सर्व धार्मिक विधी !

स्वामी अवधेशानंद यांच्या उपस्थित गंगा स्नान करतांना दीक्षा घेतलेले नागा साधू

पहाटेपासून ते रात्री १ वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये असलेल्या सर्व नूतन संन्याशांनी विधीच्या प्रारंभी आणि आजच्या विधी समाप्तीच्या वेळी मध्यरात्री गंगेच्या थंड पाण्यामध्ये स्नान केले. केवळ लंगोट परिधान केलेल्या संन्याशांनी अंग न पुसता अनवाणी पायाने जुना आखाड्यामध्ये धर्मध्वजाच्या येथे येऊन शेकोटीचा शेक घेतला. कडाक्याच्या थंडीत पहाटेपासून दिवसभर केवळ लंगोटीवर राहून संन्याशांनी हा दीक्षाविधी पूर्ण केला.

नागा साधूंविषयी भाविकांची श्रद्धा !

दीक्षा घेणार्‍या नागा साधूंनी ज्या मार्गाने गंगा तीरावरून ये-जा केली त्या मार्गावरील माती नागा साधूंची चरणधूळ म्हणून अनेक भाविकांनी स्वतःच्या कपाळाला लावली. सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत शेकडो भाविकांनी गंगातीरावर आणि श्री पंचदशनाम जुना आखाड्यामध्ये उपस्थित राहून हा विधी पाहिला.