पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार
मुंबई – सागरी किनारी रस्ता प्रकल्पालगत विज्ञापनांचे फलक उभारण्याचे कंत्राट महापालिका प्रशासनाने दिले; मात्र या फलकांना ब्रीच कँडी आणि नेपियन्सी रोड येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. सागरी किनारा मार्गालगत विज्ञापन फलक उभारल्यास पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे केली; पण मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
मुंबईकरांना या विरोधात ऑनलाईन याचिकेसाठीही स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनीही या प्रकरणी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी म्हटले.
सागरी किनारा मार्गाच्या भराव भूमीत विज्ञापन फलक उभारल्यास पर्यावरण नियमांचे उल्लंघन होईल, तसेच डिजीटल फलक उभारल्यास वाहनचालकांना त्रास होईल किंवा प्रदूषण होईल, अशाही तक्रारी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणी राज्य सरकारला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.