थोडक्यात महत्त्वाचे !

तरुणीचा पाठलाग करणार्‍याला नागरिकांकडून चोप !

डोंबिवली – मागील वर्षभर नोकरीवर जाणार्‍या एका तरुणीचा पाठलाग करणार्‍या एकाला नागरिकांनी रस्त्यावर पकडले. या वेळी तरुणीने आरडाओरडा केल्याने नागरिक एकत्र जमले आणि त्यांना त्याला पुष्कळ चोप देत पोलिसांच्या कह्यात दिले. (तरुणींनीही स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन अशांना प्रत्युत्तर द्यायला हवे ! – संपादक) या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : अशांना वेळीच शिक्षा व्हायला हवी !


टोरेस घोटाळ्यातील हवाला ऑपरेटरला अटक !

मुंबई – टोरेस घोटाळ्याप्रकरणी अन्वेषण करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेने हवाला ऑपरेटर अल्पेश घारा (वय ५४ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तो फसवणुकीतून मिळवलेली रक्कम विदेशात पाठवण्याचे काम करत होता. अल्पेशला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.


राज कुंद्रा यांची पुन्हा चौकशी !

मुंबई – कथित अश्लील व्यवसाय प्रकरणाचे अन्वेषण म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचा जबाब नोंदवला आहे. कुंद्रा यांच्या गेल्या महिन्यातील नियोजित विदेश दौर्‍याआधी ईडीच्या बलार्ड इस्टेट कार्यालयात त्यांची चौकशी झाली.


कोस्टल रोडवर २८ ठिकाणी कॅमेरे लावणार !

मुंबई – कोस्टल रोडवर वाहतूक पोलिसांनी अधिक सतर्क रहात बोगद्यातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी अधिक पोलीस तैनात करावेत, अशी विनंती मुंबई पालिकेने केली आहे. मार्गावर २८ ठिकाणी स्पीड डिटेक्शन (गतीशोधक) कॅमेरे २ महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याची माहिती पालिका अधिकार्‍याने दिली. सध्या येथे १५४ कॅमेरे आहेत. त्यात आणखी कॅमेर्‍यांची भर पडणार आहे.


आज ‘मेगाब्लॉक’ !

मुंबई – माटुंगा ते मुलुंड मुख्य मार्ग आणि ठाणे ते वाशी-नेरूळ ट्रान्सहार्बर मार्गावर मध्य रेल्वेने १९ जानेवारी या दिवशी ‘ब्लॉक’ (तांत्रिक कामांसाठी लोकलगाड्या बंद ठेवण्याचा काळ) घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर भाईंदर आणि बोरिवली दरम्यान ब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीची कामे या वेळेत करण्यात येतात. काही लोकलगाड्या रहित करण्यात येणार असून काही फेर्‍या विलंबाने धावणार आहेत. सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत जलद मार्गावरील गाड्यांसाठी हा ‘ब्लॉक’ असेल.