कराड, १४ जानेवारी (वार्ता.) – शहरातील दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ मूर्ती आहे. या परिसराचे सुशोभीकरण कराड नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली.
मुख्याधिकारी खंदारे पुढे म्हणाले, ‘‘दत्त चौकातील छत्रपती शिवराय मूर्ती परिसर सुशोभीकरणासाठी महाराजांची मूर्ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये नगर परिषदेच्या टाऊन हॉलमागे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दत्त चौकामध्ये आवश्यक असणारे स्थापत्य आणि सुशोभीकरणाचे काम झाल्यानंतर पूर्ववत् त्या ठिकाणी मूर्तीची स्थापन करण्यात येणार आहे. मूर्तीसाठी आवश्यक डागडुजी आणि रंगकाम केले जाणार आहे. सुशोभीकरणाच्या अनुषंगाने शहरातील नागरिकांना काही सूचना करायच्या असतील, तर त्यांनी याविषयीचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरूपात कराड मुख्याधिकारी यांच्या नावे नगर परिषदेमध्ये द्याव्यात. याविषयी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. परिसर सुशोभीकरण कालावधीमध्ये शहरातील नागरिकांनी कराड नगर परिषदेला सहकार्य करावे.’’