सातारा, १४ जानेवारी (वार्ता.) – खेळामुळे आत्मविश्वासासमवेत आंतरिक शक्ती मिळते. यामुळे जीवनातील संघर्षाला तोंड देता येते. ग्राम विकास विभागाच्या जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवर क्रीडा स्पर्धांचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘बलशाली देश घडवण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जिल्हा परिषदेला ‘मिनी’ मंत्रालय म्हणून ओळखले जाते. सातारा जिल्हा परिषद नेहमीच योजना राबवण्यात पुढे आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासनाच्या योजना गतीने पोचवाव्यात. शासनाच्या १०० दिवसांच्या आराखड्यानुसार करण्यात येणार्या कामांमध्ये सातारा जिल्हा राज्यात प्रथम राहील.’’