Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभमेळ्यातील भाविकांनी एच्.एम्.व्ही.पी. विषाणूविषयी घाबरण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. मनोज कौशिक, केंद्रीय चिकित्सालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक

प्रयागराज येथील केंद्रीय चिकित्सलायच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांची माहिती

डॉ. मनोज कौशिक

प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – एच्.एम्.व्ही.पी. विषाणूविषयी घाबरण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून काही वेगळ्या मार्गदर्शक सूचना नाहीत. आम्ही आमच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी मुखपट्टीचा (मास्कचा) वापर करत आहोत, अशी माहिती प्रयागराज येथील केंद्रीय चिकित्सालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज कौशिक यांनी ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली. डॉ. कौशिक पुढे म्हणाले की, केंद्रीय चिकित्सालय सेक्टर २ मध्ये स्थापित आहे. येथे प्रथमोपचार, आपत्कालीन वैद्यकीय साहाय्य, लहान आणि मध्यम शस्त्रक्रिया, अतीदक्षता विभाग, स्त्रीरोगतज्ञ, प्रसुती विभाग या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहत. येथे ३५ डॉक्टर कार्यरत आहेत. देश-विदेशांतून प्रयागराज येथे येणार्‍या सर्व रुग्णांसाठी रुग्णालय २४ घंटे कार्यरत आहे.

डॉ. कौशिक पुढे म्हणाले की, प्रतिदिन १ सहस्र रुग्णांची तपासणी येथे होत आहे. एकूण १५० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. कुंभमेळ्यात असलेल्या विविध आरोग्य केंद्रांशी हे रुग्णालय संलग्न आहे. तेथून रुग्णांना तपासणीसाठी येथे पाठवले जाते. येथील रुग्णांनाही त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रयागराज येथील स्वरूप राणी मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येईल.