मोहनदास गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटल्या प्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांना कायदेशीर नोटीस !

गायक अभिजीत भट्टाचार्य आणि महात्मा गांधी

पुणे – महात्मा गांधी भारतासाठी नव्हते, ते पाकिस्तानसाठी होते. भारत आधीपासूनच भारत होता, पाकिस्तान नंतर निर्माण झाला होता. त्यांना चुकून ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ असे संबोधण्यात येत होते. ते पाकिस्तानचे निर्माते होते. ते पाकिस्तानचे पिता होते, आजोबा होते… सर्व काही तेच होते, असे विधान गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केले आहे. अधिवक्ता असीम सरोदे यांनी त्यांना या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘केलेल्या वक्तव्याबद्दल लेखी क्षमा न मागितल्यास अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर फौजदारी खटला चालवला जाईल’, असे अधिवक्ता असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

या नोटिशीत म्हटले आहे की, गायकाने अशी टिपणी करून स्वतःची मर्यादा ओलांडली आहे. १५० हून अधिक देशांनी महात्मा गांधी यांच्या नावाने टपाल तिकिटे काढली असल्याने गायकाने त्याच्या वक्तव्याची वस्तूस्थिती तपासावी, असे अधिवक्ता सरोदे यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

तमिळनाडूचे द्रमुकचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्म संपवण्याची भाषा बोलतात, तसेच निखिल वागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही सनातन धर्म संपवण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून सनातन धर्मावर विषारी टीका करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मोहनदास गांधींवर टीका करणार्‍यांना नोटीस बजावणारे अधिवक्ता हिंदु धर्माच्या विरोधात अपमानकारक वक्तव्ये करणार्‍यांच्या विरोधातही तितक्याच तत्परतेने पाऊल उचलतील का ?