‘२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. त्यात सहभागी झालेले मान्यवर आणि संत यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार येथे दिले आहेत.
१. मान्यवर आणि संत यांनी व्यक्त केलेले मनोगत
१ अ. प्रत्येक साधकाचे आचरण अनुकरणीय असणे आणि साधकांचे वर्णन करायला शब्द नसणे : ‘अमरावती येथील एका संतांनी सांगितले, ‘‘आश्रमातील प्रत्येक साधकाकडून काही ना काही शिकायला मिळते. साधकांचे आचरण आपल्याला निश्चितच अनुकरणीय आहे. या साधकांमध्ये असलेला प्रेमभाव आणि नम्रता दुसरीकडे कुठेच पहायला मिळत नाही. साधक एवढी साधना करत असूनही ते त्यांच्याकडून झालेल्या चुका आश्रमातील फलकावर लिहितात, तर त्यांना ईश्वरप्राप्ती का बरे होणार नाही ? साधकांसाठी ईश्वराला यावेच लागेल. साधकांचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.’’
१ आ. गुरुदेवांनी सर्व साधकांना योग्य शिकवण दिलेली असणे आणि ‘साधकांची कार्य करण्याची पद्धत अन् त्यांनी हिंदु राष्ट्राप्रती केलेले समर्पण’ अवर्णनीय असणे : मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील संत म्हणाले, ‘‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) तुम्हा सर्व साधकांना पुष्कळ चांगली शिकवण दिली आहे. एखादा दिव्य पुरुषच अशी शिकवण देऊ शकतो. माझ्याकडे सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. मी ठिकठिकाणी दौरा करतो; मात्र येथील ‘साधकांची कार्य करण्याची पद्धत आणि येथील प्रत्येक साधकाने हिंदु राष्ट्राप्रती केलेले समर्पण’ यांपुढे मी अक्षरशः नतमस्तक झालो आहे. फारच चांगले आहे. आमच्या कार्यक्षेत्रात गेल्यावर तेथेही मी याचे अनुकरण करण्याचा निश्चितच प्रयत्न करीन.’’
१ इ. गुरुदेवांची भेट अद्भुत असून तिचे वर्णन करणे कठीण असणे : गुरुदेवांची भेट होण्यापूर्वी महोत्सवाला आलेल्या एक साध्वींच्या मनात काही नकारात्मक विचार येत होते, ‘मी एवढ्या हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींना भेटणार, तर त्यांच्याशी काय बोलणार ? मला काय लाभ होणार ?’; मात्र त्या साध्वींची गुरुदेवांशी भेट झाल्यानंतर त्या साध्वींच्या मनाची स्थिती पुष्कळच सकारात्मक झाली. गुरुदेवांच्या भेटीविषयी सांगतांना त्यांचा भाव पुनःपुन्हा जागृत होत होता. त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. त्या म्हणाल्या, ‘‘एवढ्या सुंदर क्षणांची मी कधी कल्पनाही केली नव्हती. भेटीमध्ये माझे मन एवढे शांत झाले होते की, जणू ‘इतके दिवस माझे मन ज्याचा शोध घेत होते, ते मला आता प्राप्त झाले’, असे मला वाटले. मी कधी कधी अध्यात्म किंवा अन्य विषय यांवर लेख लिहिते; मात्र गुरुदेवांची भेट शब्दांमध्ये गुंफणे फार कठीण आहे. ती भेट शब्दातीत आहे. गुरुदेवांच्या भेटीचे ते क्षण अविस्मरणीय आहेत.’’
२. साधिकेच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया
सर्व संत आणि हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती यांनी दिलेल्या एवढ्या चांगल्या प्रतिसादामुळे माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. माझ्या मनात ‘येथे आलेली प्रत्येक व्यक्ती आमच्या गुरुदेवांच्या घरी आली आहे. त्यांना कशाचीही उणीव भासू नये. त्या सर्वांची मने एकमेकांशी जुळू दे. त्यांचे एकमत होऊन गुरुदेवांच्या कार्यात त्यांचे समर्पण होऊ दे’, असे विचार आले. त्यानंतर मला वाटले, ‘जणू या संपूर्ण ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे दायित्व माझेच आहे. यातील प्रत्येक सेवा या माझ्याच सेवा आहेत.’ या विचाराने माझ्यातील आत्मविश्वास पुष्कळ वाढला. ‘मला काय करू नि काय नको’, असा उत्साह वाटून प्रत्येक क्षणी भरभरून आनंद मिळू लागला. मला पुष्कळ काही शिकायला मिळाले.
‘मला ही सुवर्णसंधी दिली’, याबद्दल मी तिन्ही मोक्षगुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) अन् सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘त्यांनीच माझ्याकडून यापुढेही सेवा करून घ्यावी’, अशी माझी त्यांच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’
– सौ. वैदेही पेठकर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश. (२८.८.२०२४ )