सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाच्या वतीने शहर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि वाहतूक विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करत शहर परिसरात नाकाबंदी केली होती. यामध्ये शहरातील बोगदा परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मोळाचा ओढा, वाढे फाटा, अजिंक्यतारा किल्ला, चार भिंती परिसर या ठिकाणी कारवाई चालू होती. शहर परिसरातही साध्या वेषातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी वाहन चालवण्याचे अनुज्ञप्तीपत्र, इतर कागदपत्रांची पडताळणी केली, तसेच ‘ब्रेथ ॲनालाईझर मशीन’द्वारे मद्यपींचा शोध घेतला. ३१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेपर्यंत ४ जण मद्यधुंद स्थितीत आढळल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.