श्री गुरूंच्या कृपेने मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सत्संगात रहाण्याची संधी अनेकदा मिळाली. त्या वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. त्या अनुभूती ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ साक्षात् देवीचा अवतार आहेत’, याची प्रचीती देणार्या आहेत.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा साधेपणा
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ अतिशय साध्या असून त्या सर्वांमध्ये सहजपणे मिसळून जातात. त्या जेव्हा आमच्या घरी येतात, तेव्हा त्या घरातील सर्वांना आवर्जून भेटतात. आमच्या कुटुंबातील सर्व जण स्वतःचे कुटुंबीय असल्याप्रमाणे त्या सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलतात. घरातील गृहकृत्य साहाय्यकांपासून आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांपर्यंत त्या सर्वांशी अगदी सहजतेने आणि प्रेमाने संवाद साधतात.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ लहान-थोर सर्वांशीच आपुलकीने बोलत असणे आणि ‘त्यांच्या संपर्कात येणार्या व्यक्तीचे निश्चितपणे कल्याण होते’, असे साधिकेला जाणवणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासाठी कोणीही लहान किंवा थोर नाही. जेवढ्या आदराने त्या माझ्या वडिलांशी बोलतात, तेवढ्याच आदराने त्या घरी येणार्या शिंप्याशीसुद्धा बोलतात. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ माझ्या ज्या ज्या मैत्रिणींना भेटल्या आहेत, त्या सर्वांची त्या आठवणीने चौकशी करतात.
माझ्या घरी गृहकृत्य साहाय्याला येणार्या महिलेच्या मुलाचा पुष्कळ मोठा अपघात झाला होता. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ त्या मुलाला कधीही भेटलेल्या नाहीत; परंतु त्यांनी त्याच्या आरोग्याची चौकशी केली. ‘‘तो सध्या कसा आहे ?’’, अशी विचारणाही त्या करत असतात. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली, तर ‘तिचे निश्चितपणे कल्याण होणार’, असे मला वाटते.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ तीर्थक्षेत्राचे महत्त्व आणि त्यामागील शास्त्र यांविषयी भरभरून सांगत असल्याने ऐकणार्याच्या मनात त्या तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देवाच्या महतीबद्दल एवढे सांगत असतात की, समोरची व्यक्ती देवाच्या प्रेमातच पडते. त्या ज्या ज्या तीर्थक्षेत्रात जाऊन आल्या आहेत, त्या त्या तीर्थक्षेत्राचे महत्त्व आणि त्यामागील शास्त्र इत्यादी माहिती एवढी भरभरून सांगतात की, त्या विशिष्ट तीर्थक्षेत्राच्या महिमेबद्दल मनात श्रद्धा द्विगुणित होते. ते ऐकणार्याच्या मनात प्रत्यक्षात ते तीर्थक्षेत्र किंवा मंदिर येथे जाण्याची इच्छा निर्माण होते. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळेच माझ्या मनात मंदिरांत जाण्याची इच्छा जागृत झाली. आता मला असे वाटते की, इतर ठिकाणी जाण्यापेक्षा तीर्थक्षेत्रांना जाणे अधिक लाभदायक आहे.
४. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ करत असलेली सेवा पाहून त्यांच्यातील भक्तीभावामुळे आणि त्यांच्यावरील प्रेमापोटी देवाला यावेच लागते’, असे साधिकेला वाटणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ एकदा देहलीतील आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा श्री गणेशचतुर्थी होती. त्यांनी घरातील प्रत्येकाला श्री गणेशाच्या सेवेत ज्या प्रकारे सहभागी करून घेतले, ते अतिशय उल्लेखनीय होते. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक जण सेवेत गुंतला होता; मात्र कुणाच्याही मनात कर्तेपणा नव्हता, तर निखळ आनंद होता. संपूर्ण वातावरण चैतन्याने भारित झाले होते. त्या प्रत्येक सेवा अतिशय बारकाईने पहातात, उदा. देवाला फुलांनी कशा प्रकारे सजवावे ? दिवा कुठे असावा ? त्यांच्या दृष्टीतून एकही चूक सुटत नाही. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ करत असलेली सेवा पाहून त्यांच्यातील भक्तीभावामुळे आणि त्यांच्यावरील प्रेमापोटी देवाला यावेच लागते’, असे मला वाटले.
५. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ अतिशय व्यस्त असूनही साधकांच्या साधनेतील अडचणी सोडवण्यासाठी उपलब्ध असल्याने त्या खर्या अर्थाने साधकांच्या दैवी आई असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ महर्षींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करतात. महर्षि सांगतील, त्या ठिकाणी त्या तत्परतेने जातात. त्यांचे दौरे सतत चालूच असतात. प्रत्यक्षात त्या अतिशय व्यस्त असतात; परंतु साधकांचा भ्रमणभाष आल्यावर त्या त्यांना आवर्जून वेळ देतात. ‘सर्व साधक त्यांचेच आहेत’, या भावाने त्या साधकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या साधनेतील अडचणी ऐकतात आणि त्या अडचणी सोडवतातही. त्या खर्या अर्थाने आम्हा साधकांच्या दैवी आई आहेत.
मला जेव्हा त्यांची पुष्कळ आठवण येते, तेव्हा मला त्यांचा भ्रमणभाष येतो किंवा त्यांचा संदेश तरी येतो. हे मी नेहमी अनुभवले आहे. त्यामुळे ‘त्या माझे ऐकण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात. मीच त्यांना हाक मारण्यात न्यून पडते’, हे माझ्या मनावर कोरले जात आहे.
६. अलीकडचे तथाकथित संत सर्वसाधारण व्यक्तींशी अंतर ठेवत असणे, याउलट श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ जेथे जातील त्या कुटुंबातील पद्धतींशी स्वतः जुळवून घेत असल्याने त्यांचे दार सर्वांसाठी उघडे असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ जिथे जातात, ते ठिकाण त्या दैवी बनवतात. एखाद्याच्या घरी गेले असतांना त्या पाहुण्या असल्याप्रमाणे अजिबात वागत नाहीत. उलट त्या ते घर स्वतःचेच बनवतात. त्या आमच्या घरी आलेल्या वेळी आम्हाला केवळ आनंद आणि चैतन्यच देत नाहीत, तर त्या आमच्यासाठी स्वयंपाकही बनवून देतात. अलीकडच्या काळातील तथाकथित संत स्वतः आणि सर्वसाधारण व्यक्ती यांमध्ये अंतर ठेवतात. त्या त्या संतांशी वागण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. याउलट श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ज्या कुटुंबात जातात, तेथील पद्धतींशी त्या स्वतः जुळवून घेतात. त्यांचे दार सर्वांसाठी नेहमीच उघडे असते.
आम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा सत्संग आणि सहवास लाभला नसता, तर ‘संत म्हणजे काय ?’, हे आम्हाला कधीच कळले नसते. त्या इतरांना सांगत असलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या आचरणात दिसून येते. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीच अंतर नसते. त्या स्वतःचे उदाहरण समोर ठेवून शिकवतात.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याबद्दल कितीही सांगितले, तरी ते पुरेसे होणार नाही. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणजे अखंड मानवजातीला देवाने दिलेला अनमोल ठेवा आहे. आम्हा सर्व साधकांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ दिल्याबद्दल, तसेच मला त्यांचा सत्संग आणि सहवास लाभल्याबद्दल मी श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अनन्या कुमार (सनातनचे ११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार यांची कन्या), बेंगळुरू, कर्नाटक. (२२.११.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |