पुणे – जैन साधकांसारखी वस्त्रे परिधान करून मंदिरात सोन्याचे दागिने चोरणार्या चोराला स्वारगेट पोलिसांनी कह्यात घेतले. सॅलिसबरी पार्क भागात चोरी करतांना त्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीकरण झाले होते. पोलिसांनी पडताळणी करून मुंबईतील गिरगाव येथून त्याला कह्यात घेतले. नरेश जैन असे कह्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचा मुकुट, सोनसाखळी असा ४ लाख २० सहस्र रुपयांचा ऐवज जप्त केला. जैन मंदिरात चोरी करणारा आरोपी गिरगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अन्वये पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला कह्यात घेतले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, साहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांनी ही कामगिरी केली. ७०० ठिकाणचे चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषण यातून पोलिसांनी आरोपीचा माग काढला.