आळंदी वारसास्‍थळ संवर्धनाचे दायित्‍व सर्वांचेच ! – ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक अरुण बोर्‍हाडे

‘इंद्रायणी साहित्‍य परिषदे’च्‍या वतीने आयोजित तीर्थ आणि कुंड यांंच्‍या अभ्‍यास दौर्‍यात व्‍यक्‍त केली भावना !

अरुण बोर्‍हाडे

मोशी (पुणे) – आळंदीचे स्‍थळ माहात्‍म्‍य पुरातन काळापासून आहे. त्‍याच्‍या पाऊलखुणा आता नष्‍ट झाल्‍या आहेत किंवा ज्‍या काही शिल्लक आहेत, त्‍या दुर्लक्षित आहेत. त्‍यांचे संवर्धन करण्‍याचे दायित्‍व प्रशासनाबरोबरच आपल्‍या सर्वांचेच आहे, अशी भावना ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक अरुण बोर्‍हाडे यांनी व्‍यक्‍त केली. भारतातील १८ शिवपिठांपैकी एक असलेल्‍या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्‍या तीर्थ आणि कुंड यांचा अभ्‍यास दौरा ‘इंद्रायणी साहित्‍य परिषदे’च्‍या वतीने आयोजित करण्‍यात आला होता. त्‍या वेळी अरुण बोर्‍हाडे बोलत होते. या दौर्‍यात निवृत्त उपायुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक आणि नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्‍यासह साहित्‍य, इतिहास, तसेच संशोधन क्षेत्रातील अनुमाने १०० जण सहभागी झाले होते.

आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदीकाठी असलेल्‍या १३ तीर्थांची आणि पुरातन आळंदीची माहिती वारसा स्‍थळांचे अभ्‍यासक अधिवक्‍ता नाजिम शेख यांनी दिली. विविध धर्मग्रंथांच्‍या आधारे गेली २० वर्षे संशोधन करून त्‍यांनी या स्‍थळांचा शोध घेतला आहे. ही तीर्थ किंवा कुंड म्‍हणजे जलस्रोत असतात. त्‍यांपैकी कोटीतीर्थ, मत्‍स्‍यतीर्थ, संध्‍यातीर्थ, भागीरथीतीर्थ, कपिलतीर्थ, सर्वतीर्थ, रामकुंड, चक्रतीर्थ, विष्‍णुपद, श्री कालभैरवतीर्थ आणि कुबेरगंगामधील तीर्थ आदींची माहिती घेण्‍यात आली. इंद्रायणी साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष इतिहास अभ्‍यासक संदीप तापकीर, सचिव रामभाऊ सासवडे, अलंकार हिंगे, गणेश शशिकांत सस्‍ते, सुनील जाधव यांनी या दौर्‍याचे संयोजन केले.