मसूद अझहरच्या भाषणातून पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड ! – परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

नवी देहली – आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मसूद अझहर याने पाकिस्तानातील बहावलपूरच्या मशिदीत भाषण केले. त्या वेळी त्याने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळओक केली. त्याने बाबरी ढाच्याचाही उल्लेख केला होता. प्रसारमाध्यमांनी याविषयी प्रश्‍न विचारला असता, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, मसूद अझहर देशात नसल्याचे पाकिस्तानने नेहमीच म्हटले आहे. अशा स्थितीत अझहरच्या भाषणातून पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड होतो. (मसूद अजहर पाकिस्तानात नाही, असे सांगून भारतासह संपूर्ण जगाची दिशाभूल करणार्‍या पाकिस्तानचे पितळ उघडे पाडण्यासाठी भारत पाकिस्तानात घुसून आतंकवादी अजहरला कह्यात घेणार का ? – संपादक)

१. जयस्वाल म्हणाले की, मसूद अझहर हा वर्ष २०१९ च्या पुलवामा आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार होता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित केले आहे. त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी भारताची मागणी आहे.

२. अजहर त्याच्या भाषणात म्हणाला होता की, ‘मला लाज वाटते की, मोदींसारखा दुर्बल माणूस आपल्याला आव्हान देतो किंवा नेतान्याहूसारखा (इस्रायलचे पंतप्रधान) ‘उंदीर’ आमच्या कबरीवर नाचतो… मला सांगा, माझी बाबरी परत मिळवण्यासाठी ३०० लोकही लढू शकत नाहीत का ?’

३. अझहरने जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्यांना भारत आणि इस्रायल यांच्या विरोधात नव्याने जिहादी मोहीम चालू करण्याचे आणि जगात इस्लामचे राज्य प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते.