‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आहेत. त्या गंभीर आजारी आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत.
त्यांची सेवा त्यांची दोन्ही मुले (डॉ. नरेंद्र दाते (पू. आजींचा मोठा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६५ वर्षे आणि लहान मुलगा (श्री. निरंजन दाते, वय ६३ वर्षे ), त्यांच्या दोन्ही सुना (पू. आजींची मोठी सून सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) आणि धाकटी सून सौ. नेहा निरंजन दाते, वय ५७ वर्षे)) आणि त्यांची मुलगी (श्रीमती अनुराधा पेंडसे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७० वर्षे) मनापासून करतात. साधिकेच्या लक्षात आलेली पू. दातेआजींची सेवा करणार्या दाते कुटुंबियांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. डॉ. नरेंद्र दाते
अ. ‘डॉ. नरेंद्र दाते दंतचिकित्सक असूनही सदैव नम्र असतात.
आ. ते ओळखीच्या साधकांवर भरभरून प्रेम करतात.
२. पू. दातेआजींची समर्पणभावाने सेवा करणार्या सौ. ज्योती दाते
अ. सौ. ज्योतीकाकू पू. दातेआजींची सर्वतोपरी काळजी घेतात. पू. दातेआजीही ज्योतीकाकूंवर मनापासून प्रेम करतात. ज्योतीकाकू पू. आजींचे कपडे धुणे आणि त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करणे, या सेवा नियमित करतात. पूर्वी पू. आजींची स्थिती ठीक असतांना काकू त्यांना प्रत्येक दिवशी अल्पाहार, महाप्रसाद आणि दूध ठरलेल्या वेळेत देत असत. काकूंनी या संदर्भात कधी आळस केला नाही. (आता पू. आजींना नळीने अन्न द्यावे लागते.)
आ. एकदा ज्योतीकाकू त्यांच्या आईची (पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी, सनातनच्या ११० व्या संत, वय ८२ वर्षे यांची) प्रकृती ठीक नसतांना त्यांना भेटायला पुणे येथे गेल्या होत्या. त्याच कालावधीत ‘पू. दातेआजी पडल्या’, हे ज्योतीकाकूंना कळल्यावर त्या त्वरित पुणे येथून रामनाथी आश्रमात आल्या.
३. दाते कुटुंबियांची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये
३ अ. ‘पू. दातेआजींची सेवा करणे’, हेच प्रत्येकाचे प्राधान्य आहे’, असे जाणवणे : पाचही जणांची (डॉ. नरेंद्र दाते, श्री. निरंजन दाते, सौ. ज्योती नरेंद्र दाते, सौ. नेहा निरंजन दाते आणि श्रीमती अनुराधा पेंडसे यांची) पू. दातेआजींवर अपार भक्ती आणि प्रेम आहे. ते सर्व जण पू. दातेआजींची सेवा अतिशय मनापासून करतात. त्यांचा सेवाभाव आणि क्षमता तरुणांनाही लाजवेल, अशी आहे. ‘पू. दातेआजींची सेवा करणे’, हेच प्रत्येकाचे प्राधान्य आहे. पू. दातेआजींनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत’, असे मला जाणवते.
३ आ. ‘पू. दातेआजींवरील प्रेम आणि श्री गुरूंची कृपा’ यांमुळे पू. आजींची सेवा करण्यासाठी बळ मिळते’, असा प्रत्येकाचा भाव असणे : त्यांना पू. दातेआजींसाठी नामजपादी उपाय दिवसा आणि रात्रीही करावे लागतात. ते पाचही जण आळीपाळीने नामजपादी उपाय करतात. ते एकमेकांना समजून घेऊन नामजपादी उपाय पूर्ण करूनच झोपतात. ‘पू. दातेआजींवरील प्रेम आणि श्री गुरूंची कृपा’ यांमुळे पू. आजींची सेवा करण्यासाठी बळ मिळते’, असा प्रत्येकाचा भाव असतो.
३ इ. नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा : पू. दातेआजींची खोली लहान असली, तरी ती स्वच्छ आणि टापटीप असते. खोलीतील कपाटाचे खण व्यवस्थित लावलेले असतात. सर्व जण पू. दातेआजींची सेवा करत असले, तरी कुणीही कधीच सवलत घेत नाही. डॉ. नरेंद्र दाते आणि ज्योतीकाकू निवास करत असलेल्या खोलीतही स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आहे. मला त्यांच्या खोलीत गेल्यावर थंडावा जाणवला.
३ ई. ते सर्व जण नेहमी आनंदी राहून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. ते रात्री जागत असूनही सकाळी प्रसन्न असतात.
३ उ. ते सर्व जण नम्र आहेत. ते सर्वांमध्ये मिळून मिसळून रहातात. ते सर्वांचीच प्रेमाने आणि आपलेपणाने विचारपूस करतात.
३ ऊ. त्यांची रहाणी साधी आणि विचारसरणी उच्च आहे.
३ ए. स्वतःकडे असणारे दायित्व कर्तव्यदक्ष राहून पार पाडणे : डॉ. नरेंद्र दाते आणि सौ. ज्योती दाते दायित्व घेऊन सेवा करतात. पू. आजींची सेवा करत असतांना त्यांनी त्यांच्या सेवेकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. ज्योतीकाकू पू. आजींच्या खोलीत बसून सत्संग घेतात. सौ. नेहा दाते कन्नड भाषेतील लिखाणाचे मराठी भाषेत भाषांतर करतात. त्या व्यष्टी साधनेचा आढावा दायित्व साधिकेला वेळेत देतात आणि साधनेची दिशा घेतात. श्रीमती अनुराधा पेंडसे सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतात. श्री. निरंजन दाते यांच्याकडे बांधकाम सेवेशी संबंधित बरेच दायित्व आहे. पू. आजींची सेवा करतांना कोणतेही कारण न देता प्रत्येक जण आपापले दायित्व पार पाडतात.
पू. दातेआजींचे कुटुंबीय निर्मळ आणि साधे आहेत. ‘मलाही त्यांच्यासारखे घडता येऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’
– कु. गायत्री राजेंद्र जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२४)