जामा मशिदीच्या पायर्यांखाली मूर्तींचे अवशेष असल्याचा दावा
नवी देहली – हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महासंचालकांना पत्र लिहून देहलीच्या जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. क्ररकर्मा औरंगजेबाने जोधपूर आणि उदयपूर येथील कृष्ण मंदिरे उद्ध्वस्त केली होती. देहलीच्या जामा मशिदीच्या पायर्यांमध्ये या मूर्तींचे अवशेष आहेत. याचा पुरावा औरंगजेबनामामध्ये आढळतो.‘मसिर-ए-आलमगिरी’ या मोगलकालीन पुस्तकामध्ये लिहिले आहे, ‘२४-२५ मे १६८९ या दिवशी खान जहान बहादूर मंदिरे उद्ध्वस्त करून जोधपूरहून परतला होता.’
१. औरंगजेबाच्या चरित्रात असे लिहिले आहे की, जेव्हा खान जहान बहादूरने मंदिरे पाडली, लुटली आणि मूर्तींची तोडफोड केली, तेव्हा औरंगजेब अतिशय आनंदी झाला होता. यानंतर बैलगाड्यांमधून तोडलेल्या मूर्तींचे अवशेष देहलीत पाठवण्यात आले होते. या मूर्ती जामा मशिदीच्या पायर्यांमध्ये गाढण्यात आल्या होत्या. जामा मशिदीचे सर्वेक्षण करून मूर्ती बाहेर काढून मंदिरांमध्ये पुन्हा बसवण्याची हिंदू सेनेची इच्छा आहे. या सर्वेक्षणातून औरंगजेबाची क्रूरता आणि मंदिर पाडण्याचे सत्य जगासमोर येऊ शकेल.
२. राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा हे पूर्वी हिंदु मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता म्हणाले की, अजमेर दर्ग्याला भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित केले पाहिजे. तसेच, दर्गा समितीचे त्यावरील अनधिकृत अवैध नियंत्रण हटवावे आणि त्याचे भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी श्री. गुप्ता यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची शेकडो मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या किंवा मंदिरांचे मशिदींमध्ये रूपांतर केले, तसेच काही ठिकाणी मंदिरांचे अवशेष मशिदींसाठी वापरले. आता हिंदू जागृत झाल्यामुळे ही धार्मिक स्थळे परत मिळण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच अशा स्थळांची सूची बनवून त्यांचे सर्वेक्षण करावे आणि हिंदूंना ही धार्मिक स्थळे पुन्हा मिळवून द्यावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! |