प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : केन स्वित् विन्दते महत् ?
अर्थ : मोठेपणा कशामुळे मिळतो ?
उत्तर : तपसा.
अर्थ : तपाने, परिश्रमाने.
१. सत्ता-संपत्तीच्या बळावर खरी महती आणि चिरंतन प्रतिष्ठा न लाभणे
प्रचाराने मिळतो, तो काही खरा मोठेपणा नाही. लोकप्रियता हे गमक ठरवले, तर नटनट्या, खेळाडू, चटोर (चावट) साहित्यिक आणि निवडून आलेले राजकीय पुढारी यांनाच मोठे म्हणण्याचा प्रसंग येईल. दुर्दैवाने अलीकडे तसे आढळूनही येते. खरा मोठेपणा सत्ता-संपत्तीच्या बळावर मिळवता येत नाही. सत्ता-संपत्तीच्या बळावर पुतळे उभे करता येतात. मोठमोठ्या संस्था स्वतःच्या नावावर स्थापन करता येतात; पण त्यामुळे खरी महती आणि चिरंतन प्रतिष्ठा लाभत नाही. मुंबईला काही ठिकाणी मोठमोठे सुरेख पुतळे आहेत. त्याखाली त्यांच्या नावाचे फलकही आहेत; पण हे कोण होते ?, त्यांनी काय केले ?, याचे ज्ञान मुंबईकरांनाही नसते. आता हे असे पुतळे उभे करण्यामध्ये शोभा कोणती ?
२. तप म्हणजे उदात्त ध्येयासाठी अपार कष्ट उपसण्यास सिद्ध असणे आणि तशी कार्यवाही करणे !
म्हणून युधिष्ठिराने थोरवी मिळण्याचे साधन तप हे सांगितले आहे. ‘उच्च-उदात्त ध्येयाच्या प्राप्तीसाठी सर्वस्व पणाला लावून अपार परिश्रम करण्यास निरलसपणे सिद्ध असणे, म्हणजे तप !’ मोठेपणा मिळतो, तो अशा तपाच्या बळावर स्वाभाविकपणे मिळतो, तोच खरा मोठेपणा असतो. म्हणून युधिष्ठिराने दिलेल्या उत्तराचे तपशब्दाचा देहदंडन (देहाला शिक्षा करणे), शरिराला नाना प्रकारचे कष्ट देणे, एवढाच अर्थ करू नये. धार्मिकदृष्ट्या त्यालाही काही महत्त्व आहे. अध्यात्माला आड येणारी देहबुद्धी नाहीशी करण्याच्या दृष्टीने आरंभी या देहदंडनाचा काहीसा उपयोगही होतो. यासाठीच इंद्रिय दमनाला थोडासा अर्थ आहे; पण हेतू शुद्ध आणि उदात्त नसेल, स्वयंकेंद्रित असेल, सर्व जनकल्याणाचा हेतू नसेल, तर स्वार्थबुद्धीने केलेले अत्युग्र तपही खर्या अर्थाने मोठेपणा मिळवून देत नाही. पुराणातून हिरण्यकश्यपू आणि रावण इत्यादी राक्षसांनी आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा अतीउग्र तपश्चर्या केल्या. त्याच्या बळावर असामान्य सामर्थ्य संपादन केले. त्यामुळे ते तिन्ही लोकात अत्यंत उच्छाद देऊ लागले; कारण त्यांच्या तपाचे अधिष्ठान स्वार्थी अहंकार हे होते; म्हणून त्यांचे तप हे यथार्थतेने तपच ठरत नाही.
केवळ कापणे आणि तोडणे या सामान्य गुणधर्मामुळे वैद्याच्या हातातील अन् खाटिकाच्या हातातील शस्त्र सारखेच मानले जात नाही, तसेच हे आहे. मूल्यमापनासाठी कृतीपेक्षा हेतूवर लक्ष दिले पाहिजे; म्हणून ‘तप, म्हणजे केवळ कष्ट किंवा परिश्रम नसून उदात्त ध्येयासाठी अपार कष्ट उपसण्यास सिद्ध असणे आणि तशी कार्यवाही करणे’, हे लक्षात ठेवले पाहिजे. मग ती निष्काम देवभक्ती असो की, निःस्वार्थ देशसेवा असो. ‘दोन्हीची योग्यता सारखीच आहे’, असे मी मानतो; कारण ‘संतांनीच जनी जनार्दन पहावा’, असा उपदेश केला आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)