१. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश
‘महाराष्ट्र विधानसभेचे नुकतेच निकाल घोषित झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष मिळून २३० आमदार निवडून आले अन् महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेने हिंदुत्वनिष्ठ महायुतीला एक अभूतपूर्व यश दिले. प्रश्न असा उपस्थित होतो की, गेल्या ६ मासांत असा काय फरक पडला की, महायुतीला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की, हिंदुद्वेष्ट्या महाआघाडीला अधिकृत विरोधी पक्षनेता निवडण्याएवढेही आमदार निवडून आणता आले नाहीत. (विरोधी पक्ष नेतेपदासाठी विरोधातील सर्वांत मोठ्या पक्षाकडे सत्ताधार्यांच्या एकूण आमदार संख्येच्या तुलनेत एक दशांश, म्हणजे २९ संख्याबळ असणे आवश्यक असते.)
२. संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग
पुरोगामी आणि धर्मांध यांच्या एकगठ्ठा मतांसाठी तळवे चाटणार्या राजकीय पक्षांचे खोटे कथानक लोकसभेच्या वेळी हिंदूंच्या मुळावर उठले होते. त्यात ‘राज्यघटना पालटणार’, ‘आरक्षण रहित करणार’, ‘धर्मांधांना जगणे कठीण होणार’, अशा खोट्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे महायुतीला फटका बसला आणि त्यांचे खासदार अल्प निवडून आले. त्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी सर्वप्रथम त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारल्या. त्यांनी एकत्रित येऊन एक निश्चय, एक विचार आणि एक कृती या दृष्टीने प्रयत्न केले. यासमवेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड राष्ट्रासाठी निवडणुकीत भाग घेण्याची हिंदूंना विनंती केली. या निवडणुकीच्या वेळी हिंदुहित लक्षात घेऊन अनेक ऋषीतुल्य संतांनी महाराष्ट्रात येऊन विविध ठिकाणी सभा घेतल्या. निद्रिस्त हिंदु समाजाला कृतीशील होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ नेते, हिंदूंच्या रक्षणासाठी झिजणारे समाजसेवक, यांनी हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न केले. यातून त्यांचे आशीर्वादच हिंदुत्वनिष्ठ पक्षांना मिळाले. नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथाची गादी चालवणारे आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन ‘कटेंगे तो बटेंगे’ (विभागले गेलो, तर कापले जाऊ) अन् पंतप्रधान मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ (संघटित राहू, तर सुरक्षित राहू) या घोषणा दिल्या. यासमवेतच भाग्यनगरच्या हिंदुत्वनिष्ठ नेत्या माधवी लता यांच्यासह विविध राज्यातून अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन प्रयत्न केले आणि येथेच खरे हिंदूंचे ध्रुवीकरण झाले.
३. धर्मांधांचा १७ कलमी कार्यक्रम मान्य करणे आघाडीच्या नेत्यांना भोवले !
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मांध मुसलमान नेत्यांनी त्यांचा १७ कलमी कार्यक्रम आघाडीच्या पक्षांना दिला. मौलवींनी त्यांना भेटून आरक्षणाची मागणी मांडली आणि त्याला या नेत्यांनी प्रतिसाद दिला. सुदैवाने आघाडीला एकत्रितरित्या मतदान केल्यास काय होऊ शकते, याचे गांभीर्य बहुतांश हिंदूंच्या लक्षात आले. ‘आकडा सतरा, म्हणजे हिंदूंसाठी खतरा (धोका)’, ही चेतावणी हिंदु मतदारांना देण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांनी त्यांचा विवेक जागृत ठेवून भरघोस मताने महायुतीच्या आमदारांना निवडून दिले. या निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या यशाने अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले विरोधी पक्ष या निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रातील मोदी सरकार पाडण्याच्या वल्गना करू लागले होते. हिंदूंनी एकत्रितपणे आत्मसन्मान जागृत ठेवून भरघोस मतदान केले. यापूर्वी मतदान केंद्रांवर केवळ बुरखाधारी आणि गोल टोप्या असणारेच दिसत होते. या वेळी हे चित्र पालटले. ग्रामीण भागात ‘लाडक्या बहिणी’ या लाडक्या शेतकरी भावांसह मतदानाला उत्स्फूर्तपणे उपस्थित होत्या.
४. हिंदूंचा मान-सन्मान अबाधित ठेवणे नवीन सरकारसाठी आव्हान !
‘राज्यमाता गोमाता’, मठ, मंदिरे आणि छत्रपती शिवाजी राजांचे गड-दुर्ग सुरक्षित ठेवण्याचा मोठा प्रश्न हिंदूंसमोर होता. त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येने महायुतीला पाठबळ दिले. हिंदू संघटित राहिले, तर अखंड भारत पुन्हा निर्माण करणे अशक्य नाही; मात्र हिंदू त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे विचारच करत नव्हते. आता नवीन सरकारने लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हिंदूंच्या भूमीवर होणारे वक्फ बोर्डाचे आक्रमण, जागोजागी निर्माण होणार्या मशिदी, थडगे यांची अतिक्रमणे, तसेच हिंदु सण-उत्सवांच्या वेळी होणार्या दंगली कायमस्वरूपी थांबवल्या पाहिजेत.
५. फुकट सवलती देण्यापेक्षा नागरिकांमध्ये राष्ट्राप्रती सन्मान जागृत करा !
लाडके लाडके म्हणून फुकटची प्रलोभने, फुकटचे रेशन, फुकटचे गॅस सिलेंडर इत्यादी सवलती या महाराष्ट्राला, पर्यायाने देशाला एकसंध ठेवू शकत नाही. या सवलती लवकरात लवकर बंद करून जनतेला राज्याच्या प्रगतीसाठी त्याग करण्याची प्रवृत्ती शिकवणे आवश्यक आहे. ज्या दिवशी शासनकर्ते असे करतील, तो सुदिन समजण्यात येईल. हिंदु माता, भगिनी, बांधव, संत, देवीदेवता, मंदिरे सुरक्षित ठेवण्याचे दायित्व आता शासनकर्त्यांचे आहे. हे दायित्व त्यांनी चोखपणे पाळावे, असे प्रत्येक हिंदूला वाटते. केवळ बळकट महाराष्ट्र नाही, तर बळकट भारत देश निर्माण करावा.’
(२४.११.२०२४)
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय