महाकुंभपर्वात संत, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांच्याकडून हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभपर्वात सर्व संत, विविध आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर, आचार्य, विविध आध्यात्मिक संस्था आणि समस्त भाविक यांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी उठवलेला आवाज हा संपूर्ण महाकुंभपर्वाचा केंद्रबिंदू ठरला. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले हे सर्व संप्रदाय, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांचे प्रतिनिधी त्यांचे साधनामार्ग भिन्न होते; परंतु हिंदु राष्ट्राच्या विचारावर त्यांचे एकमत होते. कुंभमेळ्यामध्ये विविध आखाडे आणि आध्यात्मिक संस्था यांनी ‘भारत राज्यघटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी आपापल्या परीने कार्य केले. याचा परिणाम, म्हणजे त्या त्या आखाड्यांचे आणि आध्यात्मिक संस्थांच्या देश-विदेशातील भक्तगणांपर्यंत भारताला हिंदु राष्ट्र करण्याचा विचार पोचला. विशेष म्हणजे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे हिंदु राष्ट्राचा विषय भारतासह जगातील सर्व देशांमध्ये पोचला. महाकुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेले विविधांगी कार्य या लेखाच्या माध्यमातून देत आहे.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वतीजी यांच्याकडून उभारण्यात आलेले होर्डिंग (फलक)

पुरी पीठाचे शंकराचार्य यांनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वतीजी यांच्या वतीने संपूर्ण कुंभमेळ्यात ठिकठिकाणी ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’, असे फलक लावण्यात आले होते. शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती यांच्या शिबिरामध्ये नियमित सकाळी ११.३० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता भाविकांसाठी मार्गदर्शन, त्यांच्या शंकांचे निरसन आणि हिंदु राष्ट्र सभेचे आयोजन करण्यात येत होते. या वेळी सर्व भक्तगण आणि भाविक ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’, अशी घोषणा द्यायचे. शंकराचार्यांच्या शिबिरामध्ये आणि शिबिराच्या बाहेरही हिंदु राष्ट्राचे फलक लावण्यात आले आहेत. शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वतीजी यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ‘हिंदु राष्ट्राचा उद्घोष आम्ही दैवी संकेतावरून केला आहे’, असे सांगितले. शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वतीजी यांचे शिबिर, म्हणजे एक प्रकारे हिंदु राष्ट्र जागृतीचे केंद्र झाले होते. त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी त्यांच्या शिबिरामध्ये सकाळी आणि सायंकाळी नियमित सहस्रो भाविक येत होते. त्या सर्वांपर्यंत हिंदु राष्ट्राचा विचार पोचला.

श्री सुनील घनवट

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी १०८ यज्ञांचा संकल्प !

‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, यासाठी राष्ट्रीय महाकाल सेनेचे (हरिद्वार) राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी आलोक गिरिजी महाराज यांनी १०८ यज्ञांचा संकल्प केला आहे. महाकुंभपर्वामध्ये या संकल्पातील पहिला यज्ञ चालू करण्यात आला आहे. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी दैवी संकेतावरून या यज्ञाचा प्रारंभ करण्यात आला’, असे स्वामी आलोक गिरिजी महाराज यांनी सांगितले. ‘यानंतर विविध धार्मिक ठिकाणी पुढील यज्ञ केले जातील’, असेही स्वामी आलोक गिरिजी महाराज यांनी सांगितले.

अखिलेश यादव यांच्या पुढे भाविकांकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष ! 

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या भेटीसाठी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आले होते. शंकराचार्यांचे दर्शन घेत असतांना उपस्थित भाविकांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’, अशा घोषणा दिल्या. अखिलेश यादव शंकराचार्यांचे दर्शन घेऊन निघून जाईपर्यंत भाविकांनी हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍या समाजवाद्यांना सर्वसामान्य हिंदूंनी दिलेले उत्तर हे उत्स्फूर्तपणे होते.

– श्री. सुनील घनवट

हिंदु राष्ट्रासाठी संतांशी समन्वय साधण्याचे हिंदु जनजागृती समितीने केलेले अतुलनीय कार्य !

श्री. प्रीतम नाचणकर

महाकुंभपर्वात आलेले संत, महंत, महामंडलेश्वर, आचार्य या सर्वांमध्ये हिंदु राष्ट्राचे विचार होते; मात्र या सर्वांपर्यंत हिंदु राष्ट्र स्थानपेची तीव्रता पोचवण्याचे आणि समन्वय साधण्याचे हिंदु जनजागृती समितीने केलेले कार्य अतुलनीय ठरले. हिंदु राष्ट्र अधिवेशन, पदयात्रा, फलक, संपर्क, उद्घोषणा आदी विविध माध्यमांद्वारे समितीने महाकुंभपर्वात हिंदु राष्ट्राचा विचार सर्वांपर्यंत पोचवला. समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्री. सुनील घनवट यांसह हिंदु जनजागृती समितीचे विविध राज्यांतून आलेले समन्वयक आणि प्रत्येक साधकाने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वत:ला झोकून देऊन कार्य केले. महाकुंभपर्वामध्ये वृत्तसंकलन करतांना याचा प्रत्यक्ष अनुभव आला. प्रत्येक आखाडा आणि आध्यात्मिक संस्था यांची भेट घेऊन समितीच्या पदाधिकार्‍यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. अनेक संतांनी समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आशीर्वाद दिला. हिंदु राष्ट्राचा विचार देशाच्या कानाकोपर्‍यात पोचण्यासाठी समितीने कुंभमेळ्यात समर्पित होऊन केलेले कार्य अतुलनीय आणि येत्या काळात त्याचे पडसाद पहायला मिळतील.

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’.

राज्यघटनेचे प्रारूप घोषित करून स्वामी आनंदस्वरूप यांचे हिंदु राष्ट्राची मुहूर्त रोवण्याच्या दिशेने पाऊल !

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूप घोषित करतांना संत-महंत

शांभवी पीठाधीश्वर आणि सशस्त्र काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंदस्वरूप महाराज यांनी हिंदु राष्ट्रात राज्यघटना कशी असेल, याचे प्रारूप घोषित केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संतांना एकत्रित करण्याचे त्यांचे कार्य चालू आहे. हिंदु राष्ट्रातील राज्यघटनेचे प्रारूप पूर्ण केले आहे. हिंदु जनजागृती समितीसमवेत स्वामी आनंदस्वरूप महाराज यांनी हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित केले. या अधिवेशनात संतांच्या उपस्थितीत स्वामी आनंदस्वरूप यांनी हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूपाचे लोकार्पण केले. या वेळी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना प्रेरित करणारे स्वामी आनंदस्वरूप लिखित ‘हम हिंदू है’, या गीताचेही लोकार्पण करण्यात आले.

– श्री. सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीच्या फलकांमुळे पोचला लाखो भाविकांपर्यंत हिंदु राष्ट्राचा विचार !

हिंदु राष्ट्राचा विचार समस्त हिंदूंपर्यंत पोचण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभक्षेत्रात ठिकठिकाणी होर्डींग लावण्यात आले. अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी या होर्डींगची वृत्ते प्रसिद्ध केली. हे होर्डींग त्रिवेणी संगम मार्गावर कुंभमेळ्यातील सर्व मुख्य मार्गांवर लावण्यात आले होते. कुंभक्षेत्रात आलेल्या कोट्यवधी भाविकांपर्यंत या होर्डींगद्वारे हिंदु राष्ट्राचा विचार पोचला. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदु राष्ट्राचा विचार पोचवणारे हे होर्डींग लक्ष्यवेधी आणि अत्यंत प्रभावी ठरले. – श्री. सुनील घनवट

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेकडून त्रिवेणी संगमावर संकल्पपूजन !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते विश्वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, यासाठी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर संकल्पपूजन अन् प्रार्थना केली.

बागेश्वर धाम सरकारच्या भक्तांचा ध्वज फडकावून हिंदु राष्ट्राचा प्रचार !

बागेश्वर धाम सरकारचे १५ ते २० भक्तगण हिंदु राष्ट्राचा ध्वज घेऊन कुंभमेळ्यात आले होते. ‘मेरा राष्ट्र, हिन्दू राष्ट्र’, असे या ध्वजावर लिहिले होते. कुंभक्षेत्रात हा ध्वज हातात घेऊन त्यांनी कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राचा प्रचार केला. यातून संतांनी केलेली हिंदु राष्ट्राची घोषणा आणि त्याविषयी भाविकांच्या मनात निर्माण झालेली हिंदु राष्ट्र निर्मितीची भावना याचा प्रत्यय आला.

गर्दीमध्ये भाविकांचा हिंदु राष्ट्राचा जयघोष !

कुंभमेळ्यामध्ये आलेले अनेक भाविक गर्दीतून जात असतांना ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’, ‘हिन्दू राष्ट्र की जय’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, असे जयघोष करायचे. गर्दीमध्ये एकाने हिंदु राष्ट्राचा जयघोष केल्यावर गर्दीतून अनेक जण हिंदु राष्ट्राचा जयजयकार करत प्रतिसाद द्यायचे. हे दृश्य, म्हणजे हिंदु राष्ट्राचा विचार सर्वसामान्यांची उत्स्फूर्त भावना असल्याचे द्योतक होते.

विश्व हिंदु परिषदेकडून हिंदु राष्ट्र-जागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम !

विश्व हिंदु परिषदेच्या सेक्टर १८ मध्ये असलेल्या शिबिराच्या बाहेर ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली. या ठिकाणी सहस्रो हिंदूंनी स्वाक्षरी करून हिंदु राष्ट्राला अनुमोदन दिले.

सर्व संतांचे हिंदु राष्ट्रासाठी समर्थन !

पुरी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती, रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज, दिगंबर आखाड्याचे संतश्री बालक योगेश्वर दासजी महाराज, निर्मल पंचायती आखाड्याचे महंत स्वामी ज्ञानदेवसिंह महाराज, आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, भाजपचे खासदार साक्षी महाराज, कर्नाटकमधील पलिमारू पिठाचे मठाधीपती १००८ श्री श्री विद्याधीश तीर्थस्वामी, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरु स्वामी अविचल देवाचार्य महाराज, शांभवी पीठाधीश्वर आणि सशस्त्र काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंदस्वरूप महाराज, जुना पंचदशनाम आखाड्याचे पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद गिरि महाराज, अष्टकौशल महंत डॉ. योगेश्वर गिरिजी महाराज अशा कितीतरी संतांनी महाकुंभपर्वात हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. या सर्व संतांची नावे घ्यायची झाली, तर जागा अपुरी पडेल.

यातील मुख्य सूत्र हेच की, सर्वच आखाडे, आध्यात्मिक संस्था, संत यांनी या कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राचा उद्घोष करून एक प्रकारे संकल्पच केला आहे. संतांच्या आशीर्वादाने अयोध्येत रामलल्लाची स्थापना झाली. भविष्यात संतांच्याच आशीर्वादाने रामराज्यावर आधारित हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, याची प्रचीती महाकुंभपर्वात आली. संतांचा हा उद्घोष लवकरच भारतातील प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये हिंदु राष्ट्राची ज्योत प्रज्वलित करील आणि लवकरच हिंदु राष्ट्र प्रत्यक्षात उतरेल, यामध्ये तीळमात्र शंका नाही.

– श्री. सुनील घनवट

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शास्त्रासह सशस्त्र युवक सिद्ध करण्याच्या कामाला ‘शिवशक्ती सेने’कडून प्रारंभ ! 

उत्तरप्रदेशमधील कानपूर येथील शिवशक्ती सेनेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शास्त्र पारंगत युवकांसह सशस्त्र संन्यासी सिद्ध करण्याच्या कार्याला प्रारंभ केला आहे. शिवशक्ती सेनेच्या वतीने आतापर्यंत २ सहस्र युवकांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रसंगी सशस्त्र क्रांती उभारण्यासाठी शिवशक्तीचे सेनेचे प्रमुख श्री. मधुराम शरण शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ३० युवकांनी संन्यास जीवन स्वीकारले आहे. उत्तरप्रदेशातील विविध गावांमध्ये जाऊन ते हिंदु युवकांना शस्त्रांचे प्रशिक्षण देत आहेत. प्रत्येक गावात २०० हिंदू युवकांना प्रशिक्षण देण्याचा त्यांचा संकल्प आहे. महाराजांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती सेनेचे युवक महाकुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राविषयी जागृती करत आहेत.

– श्री. सुनील घनवट

संपादकीय भूमिका

हिंदु राष्ट्राचा विचार देशाच्या कानाकोपर्‍यात पोचण्यासाठी कुंभमेळ्यात झालेले कार्य अतुलनीय असून येत्या काळात त्याचे पडसाद दिसतील !