हिजबुल्लाने इस्रायलवर डागली २५० क्षेपणास्त्रे

गुप्तचर तळांना लक्ष्य केले गेले

तेल अविव (इस्रायल) – लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेने २४ नोव्हेंबरच्या रात्री इस्रायलवर २५० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांद्वारे आक्रमण केले. यात इस्रायलची राजधानी तेल अविवमधील इस्रायली गुप्तचर तळांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

१. हिजबुल्लाने हैफा शहराजवळील इस्रायली सैन्य तळालाही लक्ष्य केले. हैफाच्या उत्तरेकडील सैन्य तळावरही क्षेपणास्त्रांनी मारा केला. तसेच दक्षिण इस्रायलमधील अश्दोद नौदल तळावर प्रथमच ड्रोनचा वापर करून आक्रमण केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे.

२. हिजबुल्लाचे हे आक्रमण लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या इस्रायली आक्रमणांना प्रत्युत्तर आहे. या आक्रमणांमध्ये हिजबुल्लाचा प्रवक्ता महंमद अफिफसह ६३ हून अधिक लोक मारले गेले आहेत.