मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत राज्य मराठी विकास संस्था !

‘माझिया मराठीचे नगरी…’

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने चालू केलेल्या मराठी भाषेच्या संदर्भातील ‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्‍या मराठी भाषेसाठी काम करणार्‍या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती पहात आहोत. मागील ३ भागांत संस्थेच्या काही उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भागात अन्य काही उपक्रमांची माहिती घेऊ.

शासकीय स्तरावर मराठी भाषेच्या दृष्टीने काय प्रयत्न होतात ?, हे आपल्याला ठाऊक नसते. शासकीय स्तरावरील मराठी भाषेच्या कामकाजाची तोंडओळख येथे देण्यामागचा उद्देश हा आहे की, या संदर्भात सर्वसामान्य जनता मराठीच्या वापरासाठी त्याचा लाभ कसा करून घेऊ शकते ? हे पाहू शकते, तसेच त्या उपक्रमांमध्ये वृद्धी किंवा सुधारणा करण्याच्या अनुषंगाने किंवा मराठीच्या संवर्धनासाठी तत्सम उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने शासनाला काही सुचवू शकते.                                           

(भाग ४)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/857359.html

‘राज्य मराठी विकास संस्थे’चे बोधचिन्ह

२९. महाराष्ट्राबाहेरील संस्थांना अर्थसाहाय्य 

राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणार्‍या संस्था, ग्रंथालये, तसेच दर्जेदार कार्य करणार्‍या प्रकाशन संस्था यांना अर्थसाहाय्य देण्यात येते. महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती वृद्धींगत होण्याच्या उद्देशाने हे साहाय्य केले जाते. या अर्थसाहाय्याची रक्कम मोठी असते. यापैकी एखादी संस्था मराठी भाषा किंवा संस्कृती या संदर्भात एखादा प्रकल्प राबवत असल्यास प्रकल्पापूर्वी आणि नंतर काही रक्कम दिली जाते.

३०. विज्ञानविषयक पुस्तकांचे मराठी अनुवाद

‘राज्य मराठी विकास संस्था’ आणि ‘मराठी विज्ञान परिषद’ यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत २ पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. सर्वसामान्य व्यक्तींना कळेल, अशा सोप्या रितीने मराठी भाषेतून विज्ञानातील तत्त्वे या पुस्तकांतून स्पष्ट करण्यात आली आहेत.

 ३१. अन्य राज्यांतील मराठी भाषिक समाज आणि त्यांची भाषा यांचा भाषाशास्त्रीय अभ्यास 

भारतातील इतर राज्यांमध्ये जेथे मोठ्या प्रमाणात जेथे मराठी समाज आहे, तेथे त्यांचा सांस्कृतिक आणि भाषाशास्त्रीय अभ्यास करून त्यांची भाषा अन् संस्कृती यांच्या सद्यःस्थितीचा संशोधनात्मक आढावा घेऊन, त्या माहितीचा उपयोग बहुउद्देशीय पद्धतीने करणे, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. वाराणसी येथील मराठी भाषिकांचा असा अभ्यास केला जात आहे. तेथील भाषिक नमुने आणि माहिती यांचा अभ्यास अन् विश्लेषण करणे, असा अभ्यास चालू आहे.

३२.  अन्य देश आणि राज्ये येथील संस्था अन् ग्रंथालये यांना पुस्तके पाठवणे 

राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने विविध देश किंवा भारतातील विविध राज्ये येथे मराठी भाषिकांसाठी उपक्रम राबवण्यात येतात. यापूर्वी अन्य राज्यांतील १३ मराठी मंडळांना पुस्तके पाठवली आहेत. अन्य राज्यांतील २३ ग्रंथालयांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांची मराठी पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात आली आहेत. अमेरिकेतील मराठी मंडळांनाही संस्थेने ३ वर्षे ललित साहित्याची पुस्तके पाठवली आहेत.

३३. अन्य राज्यांतील शाळांना ‘मराठी’ या भाषा विषयाची पाठ्यपुस्तके पाठवणे 

मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांतील शाळांना महत्त्वाची पुस्तके पाठवण्यात येतात. वर्ष १९९४ पासून संस्थेने आंध्रप्रदेशातील ‘महाराष्ट्र मंडळ, हैद्राबाद’ यांना त्यांनी सुचवलेल्या शाळांतील १ ली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बालभारती, कुमारभारती, युवकभारती अशी मराठीची पाठ्यपुस्तके पाठवण्यात येतात. गुजरात राज्यातील कर्णावती येथील मराठी मंडळांच्या शाळांना दैनिक ‘लोकसत्ता’ आणि ‘सकाळ’ (पुणे आवृत्ती) ही वर्तमानपत्रे पाठण्यात येतात.

३४. ग्रंथसूचीमाला प्रकल्प (वर्ष १९५१ ते २०००)

शं.ग. दाते यांनी वर्ष १९५० पर्यंतच्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची दोन भागांत सिद्ध केली होती. ही सूची बरीच वर्षे अनुपलब्ध असल्याने तिचे नवीन परििशष्टांसह पुनर्मुद्रण राज्य मराठी विकास संस्थेने केले. वर्ष १९५० नंतर मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एकत्रित अशी विषयवार ग्रंथसूची उपलब्ध नसल्याने राज्य मराठी विकास संस्थेने ‘मराठी ग्रंथसूचीमाला’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. वर्ष १९५१ ते २००० या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्यात येत आहे. आतापर्यंत वर्ष १९८५ पर्यंतच्या ग्रंथांची सूची करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक प्रकाशन संस्था त्यांच्या ग्रंथांची नावे या सूचीत येत आहेत ना ? याची निश्चिती करू शकते.

सौ. रूपाली वर्तक

३५. वस्त्रनिर्मिती माहितीकोश

वस्त्रोद्योगाची सर्वांगीण आणि अद्ययावत् माहिती मराठी भाषेतून उपलब्ध करून देणारा ‘वस्त्रनिर्मिती माहितीकोश’ हा प्रकल्प ‘राज्य मराठी विकास संस्था’ आणि ‘दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था, इचलकरंजी’ यांनी संयुक्तपणे कार्यान्वित केला आहे. भारतीय वस्त्रोद्योगाचे आजवरचे स्वरूप त्याची वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती, महाराष्ट्राचे या उद्योगामधील स्थान, होऊ घातलेले जागतिकीकरण या सर्वांचा साकल्याने विचार या कोशात करण्यात आला आहे. मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात वस्त्रोद्योगाला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान आहे; परंतु या विषयासंबंधी फारच थोडे दर्जेदार लिखाण मराठी भाषेत उपलब्ध आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी सर्वसामान्य जिज्ञासूला समजेल, अशी माहिती या कोशात देण्यात आली आहे.

या माहितीकोश प्रकल्पांतर्गत एकूण ९ खंड संकल्पित असून संस्थेने आतापर्यंत ७ खंडांचे प्रकाशन केलेले आहे. यामुळे या विषयातील तंत्रज्ञानाचा अभ्यास मराठी भाषेतून करता येणे सोपे जाणार आहे. यांसारख्या उपक्रमांमुळे मराठी आधुनिक तंत्रज्ञानाची, तसेच विज्ञानभाषा होण्यास साहाय्य होणार आहे.

‘तंतुनिर्माण व तंतुविज्ञान’, ‘सूतनिर्माण’, ‘कापडनिर्माण’, ‘रासायनिक प्रक्रिया’, ‘फॅशन आणि वस्त्रप्रावरणे’, ‘तांत्रिक वस्त्रे’, ‘वस्त्रोद्योग व्यवस्थापन’, ‘वस्त्रसंकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार’, ‘वस्त्रोद्योग परिभाषाकोश’ असे खंड आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत.

३६. दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश, संकल्पना कोश आणि साहित्य सूची

दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्यातील २ प्रवाह आहेत. वरील प्रकल्पाच्या कामात ६ सहस्र दलित-ग्रामीण ग्रंथांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यानंतर ‘दलित-ग्रामीण साहित्य वर्णनात्मक सूची’ खंड सिद्ध करण्यात येणार आहेत.

दलित-ग्रामीण साहित्यातील नवीन आणि अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्प्रयोग निवडून त्यांचे अर्थ, तपशीलांसह या कोशात दिलेले आहेत. समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रमुख संपादनाखाली शब्दकोशाचे ३ खंड आणि ‘विधी-परंपरा-कोशा’चा १ खंड प्रकाशित झाला आहे.

लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील शब्दांचा नेमका अर्थ सापडेल, असा शब्दकोश मराठीत नसल्याने असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशिलांसह या कोशात दिलेले आहेत. तो विशिष्ट शब्द असलेले साहित्यकृतीतील मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या त्या नोंदीमध्ये दिलेले आहे. वर्ष १८१८ ते २००५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या साहित्यातील शब्द यांत आहेत. पुढील वर्षांतील काम करावयाचे आहे.

अ. दलित-ग्रामीण साहित्य विधीकोश : ‘दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश’, या प्रकल्पाचाच हा एक भाग असून त्यामध्ये दलित आणि ग्रामीण साहित्यकृतींमधून आलेल्या विविध विधी, रूढी, प्रथा, परंपरा, श्रद्धा, समजूती, सण-उत्सव, नवस-सायास, दैवत, लोकाचार इत्यादी विषयांच्या अनुषंगाने सांस्कृतिक संदर्भ असलेल्या अनेक संकल्पनांचे संकलन करून त्यांची सचित्र स्पष्टीकरणात्मक माहिती या कोशातून दिली आहे

३७. मराठी संशोधन संस्थांना अर्थसाहाय्य

महाराष्ट्रातील मराठी भाषा आणि साहित्य वृद्धींगत होण्यासाठी मराठी संशोधन संस्था, मंडळे यांना अर्थसाहाय्य केले जाते. मराठी भाषेसाठी काम करणार्‍या नोंदणीकृत संस्था, मंडळे यांना संशोधन प्रकल्पांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करण्यात येते.

३८. कर्णबधिरांसाठी बालभारती समांतर पाठ्यपुस्तके

‘सुहृद मंडळ, पुणे’ यांनी कर्णबधीर विद्यार्थ्यांची भाषिक आवश्यकता लक्षात घेऊन भाषा शिकतांना त्यांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी बालभारतीच्या पुस्तकांना समांतर अशी मराठी पाठ्यपुस्तके सिद्ध केली. ती राज्यात कर्णबधीर मुलांच्या शाळांना विनामूल्य वितरित करण्यात आली आहेत.

३९. मराठीतील साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके

या प्रकल्पांतर्गत मराठीतील प्रसिद्ध निवडक संतसाहित्य, तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांचे साहित्य, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्य आणि महाराष्ट्र शासन पारितोषिक विजेते यांच्या निवडक साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके सिद्ध करण्यात येणार असून आतापर्यंत ‘ज्ञानेश्वरी’, ‘दासबोध’, तसेच ‘कृष्णाकाठ (स्व. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र)’ आदी ग्रंथांची श्राव्य पुस्तके सिद्ध करण्यात आली आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर ही पुस्तके जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.    (समाप्त)

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.११.२०२४)