‘माझिया मराठीचे नगरी…’
‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्या मराठी भाषेसाठी काम करणार्या संस्थेची, म्हणजे ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती पहात आहोत. मागील भागात संस्थेच्या काही उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भागात अन्य काही उपक्रमांची माहिती घेऊ.
शासकीय स्तरावर मराठी भाषेच्या दृष्टीने काय प्रयत्न होतात ?, हे आपल्याला ठाऊक नसते. शासकीय स्तरावरील मराठी भाषेच्या कामकाजाची तोंडओळख येथे देण्यामागचा उद्देश हा आहे की, या संदर्भात सर्वसामान्य जनता मराठीच्या वापरासाठी त्याचा लाभ कसा करून घेऊ शकते ? हे पाहू शकते, तसेच त्या उपक्रमांमध्ये वृद्धी किंवा सुधारणा करण्याच्या अनुषंगाने किंवा मराठीच्या संवर्धनासाठी तत्सम उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने शासनाला काही सुचवू शकते. मागील भागात आपण ८ उपक्रम जाणून घेतले. आता पुढील उपक्रम पाहू.
(भाग २)
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/853006.html
९. ‘युनिकोड’आधारित मराठी टंक (फाँट)ची निर्मिती
संगणकाच्या पडद्यावर मराठी लिखाण दिसण्यासाठी, तसेच लिखाण मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड आधारित मराठी टंक (फाँट) संख्येने बरेच अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांतील बहुसंख्य टंक हे महाराष्ट्र शासनाने प्रसृत केलेल्या ६ नोव्हेंबर २००९ च्या वर्णमाला किंवा वर्णलिपी विषयक शासन निर्णयात मान्य केलेल्या निकषांप्रमाणे नसल्यामुळे या शासन निर्णयांतील निकषांशी जुळतील, असे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी टंक निर्माण करून घेऊन ते जनतेला मुक्त (‘फ्री अँड ओपन सोर्स’) परवान्यांतर्गत उपलब्ध करून देण्याचे काम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतले आहे. या दोन टंकांना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत. हे टंक, तसेच त्यांची स्रोतसामुग्री (सोर्स) या गोष्टी ‘गिटलॅब’ या संग्राहिकेतून कुणालाही उतरवून घेता येतील.
हे टंक ‘युनिकोड ७.०’ या अद्ययावत् प्रमाणकावर, तसेच महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ या दिवशी प्रसृत केलेल्या वर्णमाला आणि वर्णलिपी विषयक शासन निर्णयावर आधारलेले आहेत. प्रत्येक टंकात हलका (लाईट), साधा (नॉर्मल), मध्यम (मिडियम), निमठळक (सेमीबोल्ड) आणि ठळक (बोल्ड) अशी ५ वजने (प्रकार) आहेत. प्रत्येक वजनाच्या सरळ आणि तिरपा (इटॅलिक) अशा २ शैली आहेत. ‘यशोमुद्रा’ हा टंक बोरूने काढल्याप्रमाणे (लिखाण केल्याप्रमाणे) पारंपरिक वळणाचा, तर ‘यशोवेणू’ हा टंक समरेखा, म्हणजे रेघेची जाडी सर्वत्र समान असणारा आहे. या टंकांत शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर आवश्यक ठरणारी चिन्हे अन् देवनागरी टंकांशी जुळणारे इंग्लिश टंकही समाविष्ट आहेत. यासमवेत टंकांची सर्व तांत्रिक सामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यशोमुद्रा आणि यशोवेणू हे दोन्ही टंक प्रयोगात्मक आहेत. ते टंक विकसित करणार्यांसाठी प्रमाण (मॉडेल) म्हणून समजण्यात येऊ नयेत, असे शासनाचे म्हणणे आहे. जनतेला या टंकांमध्ये पालट करण्याचा वा करवून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जाणकारांना ही सामुग्री वापरून अधिक चांगल्या टंकांची निर्मिती करून ती याच परवान्यासह लोकांना उपलब्ध करून देता येईल. संगणकावर युनिकोड आधारित मराठीचा गुणवत्तापूर्ण वापर करता यावा, या उद्देशाने संस्थेच्या वतीने युनिकोड प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.
१०. रंगवैखरी नाट्यस्पर्धा
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे सादरीकरण एकाच ठिकाणी करता येईल, अशी तसेच चित्र, शिल्प, नृत्य, गायन, संगीत यांच्यापैकी किमान ३ कलांचा समावेश बंधनकारक असणारी रंगवैखरी ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा वर्ष २०१७ पासून आयोजित करण्यात येते. ३ फेर्यांमधून सर्वोत्कृष्ट ५ नाट्याविष्कार निवडून एकूण ११ लाख रुपयांचे रोख पुरस्कार दिले जातात.
११. संदर्भ ग्रंथांच्या निर्मितीसाठी अनुदान
राज्य मराठी विकास संस्थेने आतापर्यंत ७८ पुस्तकांना निर्मिती खर्चाच्या ३५ टक्के इतके अनुदान दिले आहे. यात ‘सिंधु संस्कृतीच्या लिपीचे वाचन आणि अध्ययन’, ‘सिंधुदुर्गातील रानभाज्या’ या पुस्तकांचा समावेश आहे.
१२. दुर्मिळ ग्रंथ महाजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध करून देणे
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने प्रतिमुद्राधिकाराची (‘कॉपीराईट’ची) मुदत संपलेले दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिके महाजालावर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. संबंधितांची उचित अनुमती असल्यास ते संगणकीकृत करून अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. ख्यातकीर्त मुद्रणतज्ञ श्री. बापूराव नाईक यांचे काही महत्त्वाचे आणि संशोधनपर स्वरूपाचे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
१३. कवितांचे गाव प्रकल्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथील उभादांडा येथे १४ घरांमध्ये कविता भिंतींवर लिहून ‘कवितांचे गाव’ हा प्रकल्प उभारला जात आहे.
१४. पुस्तकांचे गाव प्रकल्प
सातार्यातील भिलारनंतर गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव येथे दुसरे ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
१५. मराठी भाषा युवक मंडळे
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र अन् महाराष्ट्राबाहेर; परंतु देशांतर्गत मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे, तसेच निवड झालेल्या प्रत्येक पात्र मंडळाला वार्षिक १० सहस्र रुपये अनुदान देण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे.
१६. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठी भाषेच्या वापरासंदर्भात शासकीय कार्यालयांसमवेत शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढावा म्हणून वर्ष २०१३ पासून शासन निर्णयान्वये प्रतीवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ष २०२१ पासून राज्य आणि राज्यातील केंद्र स्तरावरील शासकीय / निमशासकीय कार्यालये / महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व अधिकोष, सर्व शैक्षणिक संस्था / विद्यापिठे / महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जातो.
१७. मराठी भाषा गौरव दिन आणि पुरस्कार सोहळा
ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेसाठी काम करणार्या व्यक्ती आणि संस्था यांच्या पाठीवर कौतुकाची थाप अन् त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या निमित्ताने वर्ष २०१५ पासून २ पुरस्कार देण्यात येतात. सध्या त्यांची रक्कम २ लाख रुपये आहे. ‘अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक-पुरस्कार’ आणि कविवर्य मंगेश पाडगावकर ‘भाषा संवर्धक पुरस्कार’ देण्यात येतो.
१८. विश्व मराठी संमेलन
मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार आणि प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी, तसेच सर्वांमध्ये मराठीतून संवाद साधण्याची रूची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी, जनतेला प्रोत्साहित करण्याकरता पहिले ‘विश्व मराठी संमेलन’ वर्ष २०२३ मध्ये मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.
या विश्व संमेलनात ‘परदेशस्थ मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करणे, ज्या उद्योजकांना महाराष्ट्रात उद्योग चालू करावयाचा असेल, त्यांना शासकीय साहाय्य उपलब्ध करून देणे, लुप्त होत चाललेली वाद्य, खाद्य आणि वस्त्र संस्कृती यांचे स्पर्धात्मक सादरीकरण, तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्श घेणे’, हाही या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये मराठी पारंपरिक खेळ (लेझीम, ढोल, ताशे), मराठी पारंपरिक मनोरंजन (नाटक, लावणी, लोकसंगीत), समग्र मराठी साहित्याचे प्रतिनिधित्व करणारे भव्य ग्रंथप्रदर्शन, मराठी संस्कृतीतील खेळ आणि स्पर्धा अशा नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१९. दृकश्राव्य उपक्रम
राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर ‘ज्ञानेश्वरी’, ‘दासबोध’ यांसह ३ काव्यसंग्रह ध्वनीमुद्रित रूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
(१३.११.२०२४)
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.