देशाच्या इतिहासात निवडणुकीमध्ये इतके लांगूलचालन कधी बघितले नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मौलाना सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाविकास आघाडी धर्माचा वापर करून ‘व्होट जिहाद’ करत आहे. देशाच्या इतिहासात निवडणुकीमध्ये इतके लांगूलचालन आम्ही कधी बघितले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना (इस्लामी अभ्यासक) सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.


फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस ‘व्होट जिहाद’ करत आहेत, हे अतिशय खेदजनक आहे. सज्जाद नोमानी आणि उलेमा बोर्ड यांनी महाविकास आघाडीकडे १७ मागण्या केल्या होत्या. या मागण्या भयानक आहेत. ‘मुसलमानांना १० टक्के आरक्षण द्या, वर्ष २०१२ ते २०२४ महाराष्ट्रात झालेल्या दंगलींमधील मुसलमान आरोपींचे सगळे गुन्हे मागे घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणा’, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या पक्षांनी त्यांना पत्र देऊन त्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले. केवळ अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी जर महाविकास आघाडी काम करत असेल, तर त्यांच्याविरुद्ध आपल्या सगळ्यांना निश्‍चितपणे एक व्हावेच लागेल. ‘जर मूठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता’, असे तुम्हाला वाटत असेल, तर बहुसंख्य मतांनाही एक होऊन पुनर्विचार करावा लागेल.’’

धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस चा ‘व्होट जिहाद’

फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘नोमानींचा यापेक्षाही भयानक व्हिडिओ समोर आला आहे. मुसलमान समाजातील ज्या लोकांनी लोकसभेत भाजपला मतदान केले, त्यांना शोधून काढा आणि त्यांचे अन्नपाणी बंद करा. तसेच त्यांना सामाजिक स्तरावर बहिष्कृत करा’, असे त्यांनी म्हटले आहे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे लोक याविषयी एक शब्दही बोलत नाहीत. महाविकास आघाडीच्या ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नाला आम्ही निश्‍चित उत्तर देऊ. काँग्रेस लोकांना जाती-जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांच्याकडे निवडणुकीसाठी सूत्रच नसल्याने केवळ जातीयवाद करून ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.’’