Elon Musk On Russia Ukraine War : युक्रेन युद्धासाठी रशिया नव्हे, तर अमेरिका उत्तरदायी ! – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री डी सॅक्स

सॅक्स यांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओ ईलॉन मस्क यांनी केला प्रसारित !

वॉशिंग्टन – रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘टेस्ला’चे प्रमुख ईलॉन मस्क यांनी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री डी सॅक्स यांनी केलेल्या आरोपांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये सॅक्स हे युक्रेन युद्धाच्या मुळांविषयी चर्चा करतांना दिसत आहेत. सॅक्स यांनी दावा केला की, ही केवळ रशियाची आक्रमकता नव्हती, तर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘नाटो’च्या विस्तारामुळे शेजारील देशांमधील संघर्ष चालू झाला. युक्रेनचा ‘नाटो’मध्ये समावेश करण्याच्या अमेरिकेच्या प्रबळ इच्छेमुळे थेट रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना या आक्रमणासाठी प्रवृत्त केले, असे त्यांनी स्पष्ट  केले. इलॉन मस्क हे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराच्या गटात महत्त्वाचे सदस्य होते.

१. १९९० मध्ये तत्कालीन सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांना दिलेले वचन ‘नाटो’ने मोडल्याचे सॅक्स यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ही समस्या ‘नाटो’च्या विस्तारापासून चालू झाली आहे.

२. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांच्या पुतिन यांच्याशी झालेल्या संभाषणाचे वृत्त समोर आले आहे. ट्रम्प यांनी पुतिन यांना संघर्ष वाढवू नका, असे सांगितल्याचे वृत्त आहे.