तुई के, आमी के, रझाकार…रझाकार !

वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाची पाकिस्तानच्या जुलमी राजवटीतून नुकतीच सुटका झाली होती. बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध आणि चक्रीवादळ यांमुळे जवळपास ५ लाख लोक मारले गेले, जवळपास ३० लाख लोक प्रभावित झाले. नव्याने स्वतंत्र झालेला बांगलादेश युद्ध आणि त्याच्या आदल्या वर्षी आलेले ‘भोला’ चक्रीवादळाचा तडाखा यांमुळे भूकमारीसारख्या परिस्थितीतून जात होता. त्या वेळी इस्कॉन आणि श्रील प्रभुपाद यांचे भक्त असलेले जगत्‌विख्यात  संगीतकार पंडित रविशंकर आणि ‘बीटल्स’चे जॉर्ज हरिसन यांनी न्यूयॉर्क शहरात बांगलादेशाला आर्थिक साहाय्य करण्यासाठी संगीत कार्यक्रम आयोजित केला. तेव्हाच्या अमेरिकन नागरिकांना बांगलादेशाविषयी फारशी माहिती नसली, तरी संगीत क्षेत्रातील ही मंडळी सुपरिचित होती. यामुळे या संगीत कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला आणि त्यातून तब्बल अडीच लाख डॉलर (आताचे २ कोटी १० लाख रुपये) एवढी रक्कम जमा झाली. ही रक्कम बांगलादेशामध्ये ‘इस्कॉन’ संस्थेच्या शाखेला पाठवली गेली आणि या ‘इस्कॉन’ने पुढील २ मासांत जगभरातून २५ लाख डॉलर (आताचे २१ कोटी रुपये) गोळा केले. गोळा झालेल्या या रकमेतून ‘इस्कॉन’ने पुढील अनेक मास बांगलादेशातील गरीब आणि उपासमार सोसणार्‍या लोकांचे पोट भरले.

बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात जे लोक पाकिस्तानच्या बाजूने होते, त्यांना रझाकार, म्हणजेच ‘गद्दार’ (देशद्रोही) म्हटले जायचे. एकेकाळी बांगलादेशात एखाद्याला उद्देशून हा शब्द उच्चारणे शिवी समजली जायची.

बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील हिंसक विद्यार्थी मोर्चात मात्र ‘तुई के, आमी के, रझाकार…रझाकार’, अशा घोषणा दिल्या गेल्या. याचा अर्थ ‘तुम्ही कोण, आम्ही कोण रझाकार…रझाकार’, असा होतो. – प्रा. शरद पंडित पाटील

प्रा. शरद पंडित पाटील

१. कट्टरतावादी संघटनांकडून होणारी हिंसा, शेख मुजीबुर रहमान आणि जनरल झिया उर रेहमान यांची हत्या

वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारत सक्रीय साहाय्य करत असतांना बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरतावादी संघटना पाकिस्तानी सैन्यासह लढत होत्या आणि त्या देशातील स्वातंत्र्यसैनिक अन् बुद्धीजीवी वर्ग यांचे मुडदे पाडत होता. ‘रझाकारांनी’ बंगाली लोकांच्या स्वतंत्र होण्याच्या अस्मितेला हिंसेने उत्तर दिले होते. स्वातंत्र्याच्या आधीपासून बंगाली भूमीत रुजलेला कट्टरतावाद येणार्‍या प्रत्येक दशकात तीव्र होऊ लागला.

डावीकडून शेख मुजीबुर रहमान आणि जनरल झिया उर रेहमान

वर्ष १९७५ मध्ये वंगबंधू म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांची हत्या बांगलादेशातील धार्मिक कट्टरतावादाची पहिली राजकीय हत्या होती. एकदा का शेख मुजीबुर रहमान यांना मारले की, ‘सत्ता कह्यात येईल, धर्मनिरपेक्ष मूल्ये आणि भारताशी कृतज्ञता दर्शवणारे परराष्ट्र धोरण संपुष्टात आणता येतील अन् सत्तेच्या जोरावर इस्लामीकरण करून शरीयत प्रस्थापित करता येईल’, हा त्यामागचा हेतू होता. या सर्व हत्याकांडामागे धार्मिक कट्टरवादाकडे झुकलेले बांगलादेशाचे लष्करी अधिकारी होते. या सर्व घटनांमुळे जनरल झिया उर रेहमान सत्तेच्या मैदानात उतरले. एकेकाळी बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात योगदान दिलेले झिया उर रेहमान धार्मिक कट्टरवादाकडे वळल्यामुळे पाकिस्तान समर्थक बनले आणि वेळोवेळी भारतविरोधी भूमिका घेऊ लागले. सत्ता हाती आल्यानंतर झिया उर रेहमान यांनी बांगलादेशात विकासवादी कार्यक्रम राबवण्यास प्रारंभ केला खरा; परंतु त्यांच्या कार्यकाळात बांगलादेशी लष्कराचे जे इस्लामीकरण झाले होते, ते मात्र त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले. यामुळेच वर्ष १९८१मध्ये लष्कराच्या काही अधिकार्‍यांकडून त्यांची हत्या करण्यात आली. आता ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या प्रमुख असलेल्या बेगम खालिदा झिया या त्यांच्या पत्नी आहेत.

वर्ष १९७१ मध्ये बगेरहाट जिल्ह्यातील डाकरा भागामध्ये साहाय्य शिबिरामध्ये जगणार्‍या हिंदूंचे संग्रहित छायाचित्र

२. बांगलादेशात कट्टरतावाद वाढीस लावणार्‍या काही संघटना

२ अ. जमात-ए-इस्लामी : ही संघटना इस्लामिक पुनरुज्जीवनाची चळवळ आहे आणि तिची स्थापना हैद्राबादमध्ये (भारतातील आताच्या भाग्यनगरमध्ये) जन्मलेल्या मौलाना मौदुदी यांनी केली. प्रारंभी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते; परंतु नंतर त्यांनी काँग्रेस सोडून ‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना केली. मौलाना मौदुदी हे ‘हकीमिया’ संकल्पनेचे जनक समजले जातात. या संकल्पनेनुसार ‘सार्वभौमिकता अल्लाची असते, मानवांची नव्हे !’ यामुळे त्यांनी सर्वपंथसमभाव, लोकशाही ही मूल्ये नाकारली. भारताच्या विभाजनानंतर मौलाना मौदुदी पाकिस्तानात गेले.

जमात-ए-इस्लामी

‘जमात-ए-इस्लामी’ ही पाकिस्तानात केवळ एक धार्मिक संघटना नसून राजकीय पक्षही आहे. तिचे उद्दिष्ट ‘बांगलादेशात इस्लामी राजवटीची स्थापना करून शरीयत कायदा आणणे’, हा आहे. या संघटनेने बांगलादेशी जनतेला कट्टरपंथी बनवण्याचे काम केले आणि कट्टरपंथी इस्लाम अन् वहाबी यांची मूल्ये बांगलादेशात रुजवायला प्रारंभ केले. यामुळे अनेक बांगलादेशी तरुण विदेशी भूमीवर विविध इस्लामी आतंकवादी संघटनांमध्ये भरती होऊन लढले, जसे सोव्हियत युनियन (रशिया)-अफगाण युद्ध. विविध मदरशांतील धर्माच्या नावावर जिहाद करायला सिद्ध करणार्‍या तरुणांना लढण्यासाठी पाठवले गेले. परत आल्यावर, विविध आतंकवादी संघटनांमध्ये भरती होऊन लढलेल्या आणि आतंकवादाचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांनी बांगलादेशात स्वतःच्या संघटना चालू केल्या. ‘जमात-ए-इस्लामी’ ही बांगलादेशात पाकिस्तानी सैन्याबरोबर विविध प्रभावांचा वापर करून त्यांना सहकार्य केल्याकारणाने कुप्रसिद्ध झाली. जसे की,

१. पक्ष आणि इतर आघाडी संघटना यांच्या माध्यमातून धार्मिक कट्टरतावादी मूल्ये तरुणांमध्ये रुजवणे

२. मदरसा शिक्षण

३. कट्टरपंथी कारवायांसाठी महिलांना लक्ष्य करणे

२ आ. हरकत-उल-जिहाद : शेख अब्दुस सलाम याच्या नेतृत्वाखाली वर्ष १९९२ मध्ये अफगाण युद्धात लढलेल्या आतंकवाद्यांनी एकत्र येऊन हा गट सिद्ध केला होता. गटाचा प्रारंभिक निधी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखालील ‘अल कायदा’कडून थेट येत होता. या गटाचे मुख्य उद्दिष्ट ‘बांगलादेशाला कट्टर इस्लामी राज्य बनवणे’, हे आहे. हा गट अस्तित्वात आल्यापासून केवळ बांगलादेशातच नाही, तर भारत आणि नेपाळ येथेही सक्रीय आहे आणि अलीकडेच म्यानमारमधील रोहिंग्यांसह म्यानमारच्या सैन्याविरुद्ध लढत आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी संघटनांशी त्याचे संबंध इतर अनेक घटनांमध्ये अन् जगभरातील गुप्तचर संस्थांच्या अहवालांमध्येही आढळून आले आहेत.

हा गट बांगलादेशाच्या राजकीय नेतृत्वावरील आक्रमणांसाठी उत्तरदायी आहे, ज्यात शेख हसीना यांच्यावरील काही आक्रमणांचा समावेश आहे. या आतंकवादी संघटनेचे लक्ष्य नेहमीच ‘अवामी लीग’ हा पक्ष असल्याने अनेकांना शंका आहे की, ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ आणि ‘हरकत-उल-जिहाद’ हे त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. ‘हरकत-उल-जिहाद’ने संपूर्ण मदरशांमध्ये एक विस्तृत नेटवर्क (जाळे) सिद्ध केले आहे आणि त्यांचा उपयोग तरुणांना विविध आतंकवादी कारवायांसाठी भरती करण्यासाठी प्रजननभूमी म्हणून केला आहे. या विस्तृत ‘नेटवर्क’द्वारे  (जाळ्याद्वारे) या गटाने भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये मध्यम स्तराचे विविध स्फोट घडवले आहेत.

जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश

२ इ. जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश : असे मानले जाते की, हा गट वर्ष १९८९ मध्ये मौलाना अब्दुर रहमान यांनी सिद्ध केला होता. हा गट बांगलादेशात आणि बंगालमध्ये अनेक ‘स्लीपर सेल’सह (छुप्या गटांसह) सीमेपलीकडेही सक्रीय आहे. या गटाचा नेता अब्दुर रहमानचे शिक्षण एका मदरशात झाले होते, जिथे बांगलादेशाचे कट्टर इस्लामी राज्यात रूपांतर करण्याची कल्पना त्याच्या मनात रुजली. नंतर त्याने पाकिस्तान आणि सौदी अरेबिया येथे प्रवास केला अन् तेथे त्याची वहाबी विचारसरणीशी ओळख झाली. रहमान याच्या काळात सौदी अरेबियामध्ये सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. सशस्त्र लढ्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याने अफगाणिस्तानला मुजाहिदीनांच्या बरोबरीने प्रशिक्षण आणि लढण्यासाठी प्रवास केला अन् त्याने स्फोटकांचा वापर, तसेच विविध बंदुका हाताळण्याचे विस्तृत ज्ञान मिळवले. त्याने हे प्रशिक्षण संघटनेच्या ‘कॅडर’ना (प्रशिक्षणार्थींना) दिले, जे नंतर पुढच्या श्रेणीत गेले आणि ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’ ही संघटना वाढली अन् विस्तारत गेली.

वर्ष २००५ मध्ये ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’ने बांगलादेशातील ६३ जिल्ह्यांमध्ये बाँबस्फोट मालिका घडवून आणली, ज्यामुळे ‘रॅपिड ॲक्शन बटालियन’ला ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’च्या नेतृत्वाचा शोध घेण्याचे काम देण्यात आले. अब्दुर रहमानला वर्ष २००६ मध्ये अटक करण्यात आली आणि इतर ६ प्रमुख नेत्यांसह त्यांना मार्च २००७ मध्ये फाशी देण्यात आली. चौकशीच्या वेळी असे समजले की, या गटाला मानणार्‍यांची संख्या जवळपास १ लाख आहे. अर्धवेळ ‘केडर’सह १० सहस्र पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. या गटाकडे गंभीर शस्त्रे आणि स्फोटकेही होती. बंगालमधील मालदा, नादिया आणि मुर्शिदाबाद या ३ जिल्ह्यांमध्ये हा गट सक्रीय असल्याचेही या बटालियनने उघड केले.

जुलै २००६ मध्ये दक्षिण बांगलादेशातील झलकाठी जिल्ह्यात २ पाकिस्तानी आतंकवाद्यांना अटक करण्यात आल्याने रहमान याचे पाकिस्तानी आतंकवादी संघटनांशी संबंध उघड झाले. अटक केलेल्या आतंकवाद्यांनी उघड केले की, ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’चे ‘लष्कर-ए-तोयबा’शी पुष्कळ जवळचे संबंध आहेत. ‘लष्कर-ए-तोयबा’चे कार्यकर्ते प्रशिक्षणासाठी बांगलादेशात जातात आणि बांगलादेशाचा मार्ग वापरून भारतात घुसखोरी करण्यासाठी ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’च्या  संसाधनांचा वापर करतात.

हिजबुत-तहरीर

२ ई. हिजबुत-तहरीर : दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील २० हून अधिक राष्ट्रांमध्ये या गटाचे अस्तित्व आहे. या गटाची स्थापना प्रा. मोइउद्दीन अहमद याने केली होती. वर्ष २००९ मध्ये या गटावर बंदी घालण्यात आली असली, तरी भूमिगत संसाधनांचा वापर करून इतर मार्गांनी त्यांचे कार्य चालू ठेवले आहे. अहमद याने विविध विद्यापिठांमध्ये ‘नेटवर्क’ विकसित केले. यामुळे सरकारला भीती वाटते की, तरुणांमध्ये त्याचा वाढता आधार ही एक मोठी चिंता आहे. हा गट बांगलादेश बॉर्डर गार्ड्स (सीमारक्षक दल) आणि लष्कराच्या विविध श्रेणींमध्येही पोचला आहे, ज्यामुळे तो वर्ष २०१२ मध्ये शेख हसीना सरकारच्या विरोधात उठाव करू शकला; परंतु यशस्वी होऊ शकला नाही. या सत्तापालटात मोठ्या संख्येने ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या नेत्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा गट वर्ष २०१० मध्ये भारतात सक्रीय होता. सत्ता पालटानंतर बांगलादेशी सरकारने या गटावर कठोरपणे कारवाई केली. तरीही या गटाने विद्यापिठातील विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीयरित्या लोकप्रियता मिळवली आहे.

(क्रमश:)

– प्रा. शरद पंडित पाटील, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, जळगाव.

(साभार : दैनिक ‘जळगाव तरुण भारत’, दिवाळी विशेषांक २०२४)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/853646.html