तुई के, आमी के, रझाकार…रझाकार !

११ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कट्टरतावादी संघटनांकडून होणारी हिंसा, शेख मुजीबुर रहमान आणि जनरल झिया उर रेहमान यांची हत्या, बांगलादेशात कट्टरतावाद वाढीस लावणार्‍या काही संघटना’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/853251.html

बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात जे लोक पाकिस्तानच्या बाजूने होते, त्यांना रझाकार, म्हणजेच ‘गद्दार’ म्हटले जायचे. एकेकाळी बांगलादेशात एखाद्याला उद्देशून हा शब्द उच्चारणे शिवी समजली जायची. बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील हिंसक विद्यार्थी मोर्चात मात्र ‘तुई के, आमी के, रझाकार…रझाकार’, अशा घोषणा दिल्या गेल्या. याचा अर्थ ‘तुम्ही कोण, आम्ही कोण रझाकार…रझाकार’, असा होतो. – प्रा. शरद पंडित पाटील

३. बांगलादेशातील वाढता मूलतत्त्ववाद भारतीय राष्ट्रीय सुरक्षेला धोका !

वर्ष १९७१ मध्ये चुकनगरमध्ये झालेल्या हत्याकांडाचे संग्रहित छायाचित्र

बांगलादेशातील परिस्थिती गंभीर आहे आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचे अनेक गंभीर परिणाम होत आहेत. पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’द्वारे वित्तपुरवठा केलेले अनेक इस्लामी गट आसाम आणि बंगालमध्ये सक्रीय झाले आहेत. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी २००३ मध्ये बांगलादेशाला भेट दिल्यानंतर ‘आय.एस्.आय.’ने बांगलादेशात त्यांच्या कारवाया करण्यास संमती मिळवली. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या संबंधांची व्याप्ती अशा बिंदूपर्यंत जाते, जिथे बांगलादेशाचे ‘महासंचालक, फोर्सेस इंटेलिजन्स’ हे पाकिस्तानी सैन्याला नवीन संघटना सिद्ध करण्यासाठी अन् भारताच्या ईशान्येकडील बंडखोर गटांचे पोषण करण्यासाठी संगनमत करत होते. भारताच्या ईशान्येला बंडखोरीचे केंद्र ठेवून भारतीय लष्कराची संसाधने काश्मीरपासून दूर वळवण्याचा पाकिस्तानचा हेतू साधा आहे. पाकिस्तान आर्थिक युद्ध पुकारण्यासाठी आणि भारताच्या विकासात व्यत्यय आणण्यासाठी बनावट (खोट्या) नोटांचा वापर करत आहे. जातीय सलोखा बिघडवण्यासाठी आणि जातीय दंगलीत गुंतवून ठेवण्यासाठी ते मूलतत्त्ववाद्यांना भारतात पाठवत आहेत, तसेच तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या वापरास प्रोत्साहन देत आहेत, ज्यामुळे आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी त्यांची क्षमता न्यून होत आहे.

प्रा. शरद पंडित पाटील

भारताच्या दक्षिण आशियातील प्रभावामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि इस्लामी कट्टरपंथीय विचारधारेच्या वाढत्या प्रभावामुळे बांगलादेशींना अशा प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळते. शेख हसीना यांचे सरकार आतंकवाद्यांवर कारवाई करण्यात पुष्कळ सक्रीय होते; परंतु एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत त्यांना देश सोडायला भाग पाडल्यावर आता मात्र या कट्टरपंथियांना मोकळे रान मिळाले आहे. ‘आय.एस्.आय.’चे लक्ष केवळ इस्लामी गटांपुरते मर्यादित नाही, तर ‘उल्फा’ आणि ‘एन्.एस्.सी.एन्.-आय.एम्.’ यांसारख्या बंडखोर गटांवरही आहे. असे बरेच पुरावे आहेत, ज्यात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘उल्फा’चे शीर्ष ‘कॅडर’ ढाका येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या संपर्कात होते आणि त्यांनी अनेक प्रसंगी खोटी नावे अन् पाकिस्तानी पारपत्राने पाकिस्तानला प्रवास केला आहे.

‘इस्लामिक लिबरेशन आर्मी ऑफ आसाम’,‘ मुस्लिम युनायटेड फ्रंट ऑफ आसाम (एम्.यू.एल्.एफ्.ए.)’ आणि ‘मुस्लिम युनायटेड लिबरेशन टायगर्स ऑफ आसाम (एम्.यू.एल्.टी.ए.)’ या गटांमध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ‘भारतीय गुप्तचर संस्था’ आणि पोलीस यांच्या अहवालानुसार हे गट वर्ष १९९४ ते १९९६ या काळात कुठेतरी सक्रीय होऊ लागले. तेव्हापासून या गटांनी आसाममधील बारपेटा, नलबारी, धुबरी आणि गोलपारा जिल्ह्यांमध्ये बर्‍यापैकी गड प्रस्थापित केला आहे. गौहत्तीमधून ‘आय.एस्.आय.’ एजंटांसह ‘हुजी-बी’ आणि ‘एच्.यू.एम्.’ (हरकत उल मुजाहिदीन) यांच्याशी संबंधित आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

३ अ. भारतातील आतंकवादी संघटनांना पाकिस्तान-बांगलादेश सैन्याकडून साहाय्य : विद्यमान पाकिस्तान-बांगलादेश सैन्य गटबंधनाने या आतंकवादी गटांना एक मजबूत वित्तपुरवठा प्रणाली विकसित करण्याची अनुमती दिली आहे. विविध आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांसाठी हवाला म्हणून काम करणार्‍या आणि धार्मिक निधी गोळा करण्यासाठी स्वयंसेवी संस्था अन् मदरसे यांचा आघाडी म्हणून वापर केल्याने गटांना त्यांच्या क्रियाकलापांना पोलीस, तसेच एजन्सी यांच्या नजरेपासून लपवण्याची अनुमती मिळाली आहे. हे विशेषतः महत्त्वपूर्ण आहे; कारण हे उघड झाले आहे की, ‘कुकी-चीन नॅशनल फ्रंट (के.एन्.एफ्.)’, एक सशस्त्र ख्रिस्ती गट, ‘जमाअतुल अन्सार फिल हिंदल शर्किया’ या नुकत्याच स्थापन झालेल्या इस्लामी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे. अशा संघटना हे तथ्यही समोर आणतात की, जरी गट कट्टर धार्मिक विचारसरणीचे अनुकरण करत असले, तरी परस्पर लाभासाठी ते त्यांच्या विचारसरणीशी जुळत नसलेल्या दुसर्‍या गटाशी मैत्री करतील.

४. बांगलादेशातील हिंदूंची होत असलेली दुःस्थिती

बांगलादेशातील इस्कॉन मंदिर एकेकाळी उपासमार झेलणार्‍या जनतेचे ‘भरण पोषण करणारे केंद्र’ म्हणून विकसित झाले होते. जिथे गरजूंना मोकळ्या मनाने विनामूल्य जेवण दिले जात होते. हे मंदिर करुणेचे स्मारक होते. भुकेल्यांसाठी जगातील सर्वांत मोहक सुगंध, म्हणजे अन्नाचा सुगंध, जो सुगंध त्या मंदिरात दरवळत होता, दयाळूपणाला सीमा नसते, या कल्पनेचा तो पुरावा ! तेच मंदिर आता चालू झालेल्या आंदोलनाच्या आड खंडित केले गेले. मंदिरातील भंजन केलेल्या मूर्त्या, तुटलेल्या खिडक्या आणि विस्कटलेली हिंदु धार्मिक चिन्हे इस्लामी कट्टरपंथियांच्या आक्रमकतेची कहाणी सांगतात, अशी कहाणी ज्यात त्या मंदिरांच्या माध्यमातून केलेले सत्कर्म आणि उपकार कट्टरपंथियांद्वारे सोयीस्करपणे विसरले गेले, तसेच आता बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख, शांतीचे ‘नोबेल’ पारितोषिक विजेते महंमद युनूस यांनी मुसलमानांच्या अजानच्या वेळेस हिंदूंना आरती आणि पूजा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

(समाप्त)

– प्रा. शरद पंडित पाटील, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, जळगाव.

(साभार : ‘जळगाव तरुण भारत’, दिवाळी विशेषांक २०२४)