अमेरिकेच्या न्याय विभागाचा आरोप
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कालावधीत डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या आक्रमणाविषयी अमेरिकेच्या न्याय विभागाने मोठा दावा केला आहे. डॉनल्ड ट्रम्प यांच्यावरील आक्रमणामागे इराणचा हात होता, असा आरोप या विभागाने केला आहे. इराणने ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप मॅनहॅटन येथील न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या फौजदारी तक्रारीत करण्यात आला आहे.
१. इराणच्या ‘अर्धसैनिक क्रांतिकारी दला’च्या एका अधिकार्याने एका भाडोत्री ‘शूटर’ला ट्रम्प यांना ठार मारण्याची योजना आखण्याचे निर्देश दिले होते, असे न्यायालयाला सांगण्यात आले. फरहाद शाकेरी नावाच्या इराणी सरकारी कर्मचार्याकडे ट्रम्प यांची हत्या करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते, असे या तक्रारीत पुढे म्हटले आहे.
२. डॉनल्ड ट्रम्प यांना १३ जुलैला बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे प्रचारसभेला संबोधित करतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत एक गोळी डॉनल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली होती. या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता.
३. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर इराणने ‘ट्रम्प यांच्या विजयाचा इराणवर कोणताही परिणाम होणार नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.