QR Identification Of Doctors : ‘क्यूआर् कोड’द्वारे आधुनिक वैद्यांची ओळख पटवता येणार !

  • महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा प्रयत्न

  • चिकित्सालयाच्या बाहेर लावावा लागणार ‘क्यू.आर्. कोड’ !

मुंबई – बोगस आधुनिक वैद्यांना आळा बसावा आणि सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीकृत आधुनिक वैद्यांची माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एम्.एम्.सी.ने) विशेष अ‍ॅप सिद्ध केले आहे. या अ‍ॅपवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या आधुनिक वैद्यांना ‘क्यूआर् कोड’ देण्यात येणार आहे. हा कोड चिकित्सालयाच्या बाहेर लावणे बंधनकारक ठरणार आहे. तो स्कॅन केल्यावर संबंधित आधुनिक वैद्यांची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

सध्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे राज्यभरातील १ लाख ९० सहस्र आधुनिक वैद्यांची नोंद आहे. त्यांची ऑनलाईन नोंदणी ‘विशेष अ‍ॅप’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. आतापर्यंत यातील १ लाख ३४ सहस्र आधुनिक वैद्यांनी अ‍ॅपवर नोंदणी केली आहे.