सैनिकांसाठी प्राणवायू प्रकल्प उभारणारे पुणे येथील चिथडे कुटुंबीय !

भारताच्या सियाचीन सीमेवर असलेल्या सैनिकांना प्राणवायू मिळावा, यादृष्टीने ‘प्राणवायू प्रकल्प’ उभारण्यासाठी दिवंगत योगेश चिथडे आणि श्रीमती सुमेधा चिथडे तळमळीने अन् जिद्दीने प्रयत्न करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो’, या वचनाला अनुसरून देशहिताविषयी सतत विचार करणार्‍या श्रीमती सुमेधा चिथडे यांनी देशप्रेम म्हणजे काय ? राष्ट्र्रहितासाठी मी काय करू शकते ?, याविषयी स्वतःच्या कृतीतून सर्व भारतियांसाठी आदर्श धडा घालून दिला आहे. या कार्यासाठी त्यांनी त्यांचे सोणेनाणेही विकले. या कार्यासाठी त्यांचे पती दिवंगत योगेश चिथडे आणि श्रीमती सुमेधा चिथडे यांना ‘स्वयं गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या या गौरवास्पद कार्याविषयी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. ‘यू ट्यूब’वरील ‘स्वयं टॉक्स’ या कार्यक्रमात नुकताच श्रीमती सुमेधा चिथडे यांच्याशी त्यांच्या कार्याच्या संदर्भात वार्तालाप करण्यात आला. ३ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी प्रेरणा कशी झाली, प्रारंभीचे प्रयत्न हा भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/850531.html

५. प्राणवायू प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये समाजाचा सहभाग

अ. प्रारंभी आम्ही आमच्या मिळकतीतून प्रारंभ केला. मग हळूहळू ज्यांना याचे महत्त्व समजायला लागले, तेही जवळ यायला लागले. ‘प्राणवायू निर्मिती प्रकल्पा’साठी अडीच कोटी रुपये खर्च येणार होता. एवढे पैसे आणायचे कुठून ?, प्रश्न होता. मी हा प्लांट माझ्या घरासाठी बसवत नाही. सैनिक आपल्या संपूर्ण राष्ट्राचे आहेत. सामान्य नागरिकांना याच्यामध्ये जोडून घेतले पाहिजे. सर्वसाधारणपणे असे दिसून आले की, लोकांना साहाय्य करायचे आहे आणि त्यांची देण्याची इच्छाही आहे; परंतु त्यांना त्यांचा पैसा हा शेवटच्या वापरणार्‍यापर्यंत जाईल, असा विश्वास देणे आवश्यक आहे. हा विश्वास जपण्यासाठी आमची दोघांची पराकोटीची धडपड असते. त्यामुळे समाजाने जर साथ दिली, तर काय उभे राहू शकते, याचे चांगले उदाहरण, म्हणजे सैनिकांसाठी हा प्राणवायू प्रकल्प आहे.

आ. हे आम्ही दोघांनी केले, असे मला म्हणायचे नाही. परमेश्वराने बुद्धी दिली, समाजाने सहकार्य केले आणि सैन्यदलाने संधी दिली; म्हणून हे कार्य उभे राहू शकले. त्यामुळे चुकूनही कर्तेपण घेणे चुकीचे होईल. आम्हाला समाजाचे सहकार्य अजूनही अपेक्षित आहे.

श्रीमती सुमेधा चिथडे

६. प्रकल्पासाठी धन उभे करतांना आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात

अनेक अडचणी आल्या किंवा लोकांनी प्रश्न विचारले, म्हणजे आपले बळ अधिक वाढते. कोरोना महामारी अगदी अत्युच्च स्थितीत असतांना ‘राष्ट्र पहिले’ हा विचार कसा पोचवायचा असा विचार पडला. मी समर्थभक्त आहे. मी १३ दिवस १३ घरी प्रतिदिन पावन भिक्षा मागायला लोकांच्या दारात जात असे. संत आपल्याला अशा गोष्टी सांगतात. त्यामागे चांगला उद्देश असतो. आपण लोकांच्या दारात जातो, तेव्हा लोक दार बंद करतात, आपल्याला खोटी कारणे सांगतात, आपला अपमान करतात. हे पचवता आले पाहिजे. कोरोनाच्या काळात मला पूर्वसूचना देऊन जावे लागत असे. मी कुणाच्या घरात पाणी किंवा काही घेतले नाही. मी सांगायचे, ‘मी सैनिकांसाठी हे करते, हा माझा इतिहास, आमचा न्यास नोंदणीकृत आहे, कर सवलत आहे. तुमची इच्छा असेल, तर तुम्ही देऊ शकता.’ त्याच वेळी मी दारात उभे राहून पावती द्यायचे. एके दिवशी १३ घरी कुणीही मला दारातच उभे केले नाही. वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो पैसा मिळाला, तर तो हवाच असतो. मनावर संयम किंवा बंधन हवे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे, तितकी भगवंताची घरे. माझा संदेश पोचल्यानंतर त्यांनी नाही म्हटले, तर परमेश्वराची इच्छा. यातून आपल्याला तो संपन्न अनुभव येतो. एका दिवशी १० घरे झाली आणि मग १३ कशी पूर्ण करायची; म्हणून मग रस्त्यावरचे फळवाले, रिक्शावाले यांना संपर्क केला. एक रिक्शावाला म्हणाला, ‘‘ताई आज ना फारसा व्यवसाय नाही झाला. ५० रुपये देऊ का ?’’

मी म्हणाले, ‘‘दे की बाबा. राष्ट्र आपल्या सगळ्यांचे आहे.’’

फळवाले, भाजीवाले, रिक्शावाले, घरकाम करणार्‍या मावशी कुणकुणाचे यात योगदान नाही ? एका घरात एक ८ वर्षांची मुलगी रुसून बसली होती. कुणाशी बोलत नव्हती. मी विचारले, ‘‘बाळा तुला काय झाले ? ती म्हणाली, ‘‘वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते आणि मला ‘रिटर्न गिफ्ट’च मिळाले नाही. यात त्या ८ वर्षांच्या मुलीचा दोष नाही. आपण मुलांना निरपेक्ष द्यायलाच शिकवत नाही. आपण वयाने वाढतो, तसे आपण आपल्या चुका स्वीकारायला पुष्कळ मागे जातो. ‘रिटर्न गिफ्ट’ हे आले कुठून. केवळ निखळ द्यायला शिकवा ना, मुले देतील. तसाही एक अनुभव आला. एका सोसायटीमधील कार्यक्रमात एक छोटी मुलगी आली होती. सैनिकांचे जीवन ऐकून ती रडली. आपल्या बाबांचा हात धरून माझ्याकडे आली आणि तिच्या ‘पिगी बँक’मध्ये साठवलेले सगळे पैसे त्या मुलीने दिले. तुम्ही संस्कार द्या आणि तो संस्कार आपल्या जगण्यातून आला पाहिजे. हे असे केले पाहिजे; पण कोण करतय ते माझ्या दृष्टीला दिसले पाहिजे, तर मी अनुकरण करीन. त्यामुळे अशा माणसांनी आम्हाला समृद्ध घडवले.

दिवंगत योगेश चिथडे

७. देशासाठी लढणार्‍या सैनिकांना समाजातून प्रोत्साहन मिळणे आवश्यक !

आमचा एक अधिकारी होता लेफ्टनंट ओम पैठणे आता तो कॅप्टन आहे. तो पुण्यामध्ये ‘ओला’ चालवत होता. घरी आईवडील शेती करणारे. एक दिवस आमचे कर्नल त्याच्या कॅबमध्ये बसले. तेव्हा ते ओमला म्हणाले, ‘‘तू काय करतोस? पुढे जाऊन काय करणार?’’ तो म्हणाला, ‘‘आता पदवीधर होईल, मग पुढे पाहू.’’ तेव्हा ते त्याला म्हणाले, ‘‘तू सैन्यात का जात नाहीस?’’ तो म्हणाला, ‘‘याविषयी मला काही माहिती नाही.’’ एवढाच संवाद दोघांमध्ये झाला. विषय डोक्यात घेणे आणि जिद्दीने ते पूर्ण करणे हे त्याने केले. त्या मुलाला ‘यु.पी.एस्.सी.’ ‘एम्.पी.एस्.सी. काही माहीत नव्हते. ते जाणून घेऊन आज तो मुलगा आपल्या सैन्यामध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. त्याच्या आईवडिलांना त्यांचा मुलगा एवढा मोठा अधिकारी झाला, हे माहीतही नाही. या मुलाचे कौतुक कोण करणार ? मी एक आई आहे; म्हणून सांगते.

८. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांना आधार द्या !

आपल्या मुलांना कष्ट करायला लावा. ठरवून नकार पचवायला लावा. त्यांच्या आयुष्यात अडचणी ठरवून निर्माण करा. त्यांना त्याला सामोरे जाऊ दे. मी वर्ष १९९९ चे युद्ध झाल्यानंतर त्या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या घरी जाण्यास प्रारंभ केला. जेव्हा आम्ही घरी जातो, विशेषकरून ग्रामीण भागामध्ये असलेल्या सैनिकाच्या घरी जातो. त्यांच्या घरातील माणूस हुतात्मा होतो, तेव्हा त्यांना त्यांचा माणूनही बघायला मिळत नाही. अतिरेक्यांसमवेतच्या युद्धात कशा गोळ्या शरिरात शिरलेल्या असतात, शरीराची कशी अवस्था झालेली असते, हे सगळे शब्दांच्या पलीकडचे असते. आमच्या अशा कित्येक मुली आहेत की, ज्या गरोदर आहेत आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांना पाहिलेलेही नसते. लहान वयात लग्न झालेली असतात. आपण शहरामध्ये पुष्कळ छान जगतो. अशी पाळी कुणावर येऊ नये. या मुलींनी आधी त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजे. अशा २ मुली आम्ही दत्तक घेतल्या आहेत.’

– श्रीमती सुमेधा चिथडे, पुणे.

संकेतस्थळ : sirf.org.in

(साभार : ‘स्वयं टॉक्स’ कार्यक्रम)